ज्येष्ठ समालोचक सुनील गावसकर यांची भूमिका, भारतातील साधारण कामगिरीकडे अंगुलीनिर्देश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘दिवंगत शेन वॉर्नने अव्वल दर्जाचे, जादूमय चेंडू टाकले. आपल्या कारकिर्दीदरम्यान त्याने लेगस्पिनच्या अवघड कलेवर महिरथ प्राप्त केले. मात्र, तो सर्वकालीन महान फिरकीपटू ठरु शकत नाही. कारण, त्याची भारतातील कामगिरी अगदीच साधारण स्वरुपाची आहे’, अशी भूमिका ज्येष्ठ समालोचक सुनील गावसकर यांनी मांडली. त्यांच्या या भूमिकेवर सोशल मीडियातून प्रचंड पडसाद उमटले.
1992 मध्ये पदार्पण करणाऱया शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियातर्फे 145 कसोटी सामने खेळत लेगस्पिनच्या बळावर 708 बळी घेतले. याशिवाय, 194 वनडेत त्याने 293 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
वॉर्न आपण पाहिलेला सर्वोत्तम फिरकीपटू आहे का, या प्रश्नावर गावसकरांनी मात्र नकारार्थी उत्तर दिले. काही भारतीय फिरकीपटू आणि लंकेचा मुथय्या मुरलीधरन हे वॉर्नपेक्षा अव्वल होते, असे ते म्हणाले.
‘भारताविरुद्ध शेन वॉर्नची कामगिरी साधारण स्वरुपाची होती. भारतात तर तो अगदीच निष्प्रभ ठरत गेला. नागपूरमध्ये त्याला केवळ एकदाच 5 बळी घेता आले. ते ही झहीरने अनाठायी फटका मारल्याने शक्य झाले. भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजी उत्तम खेळू शकतात आणि त्यांनी वॉर्नचा सहज समाचार घेतला असल्याने मी वॉर्नला महान फिरकीपटू असे संबोधणार नाही’, याचा गावसकर यांनी येथे पुनरुच्चार केला.
गावसकरांच्या भूमिकेवर विदेशी माध्यमांची टीका
वॉर्नवर टीका करण्याची ही वेळ नव्हे, असे फॉक्स न्यूजने यावेळी नमूद केले. गावसकर एकीकडे लेगस्पिन कठीण कला असल्याचे कबूल करतात आणि त्याचवेळी वॉर्नवर टीका करतात, हे वेरोधाभास दर्शवणारे आहे, असे न्यूज डॉट कॉम एयूने म्हटले.
वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे थायलंड पोलिसांचे स्पष्टीकरण
ऑस्ट्रेलियन क्रिकेट स्टार शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला असल्याचे थायलंड पोलिसांनी सोमवारी जाहीर केले. डॉक्टरांच्या पथकाचा अहवाल आला असून वॉर्नच्या कुटुंबियांनी देखील घातपात असल्याची कोणतीही शंका घेतलेली नाही, असे थायलंड पोलिस प्रवक्त्याने म्हटले. थायलंड पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाची प्रत वॉर्नचे कुटुंबिय व ऑस्ट्रेलियन दुतावासाला पाठवला.
यापूर्वी, शुक्रवारी वॉर्न एका थाय रिसॉर्टमधील आपल्या हॉटेल रुममध्ये निपचित पडल्याचे आढळून आला होता. त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. पण, त्यापूर्वी त्याची प्राणज्योत मालवली होती. वॉर्नचे पार्थिव ऑस्ट्रेलियाला पाठवले जाणार का, याबद्दल सोमवारी सायंकाळपर्यंत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.