सनरायजर्स हैदराबादविरुद्ध अवघ्या 58 चेंडूत नाबाद 92 धावांची आतषबाजी, रोव्हमन पॉवेलसह 11 षटकात 122 धावांची अभेद्य भागीदारी, आयपीएल साखळी लढतीत दिल्ली 21 धावांनी विजयी, खलील अहमद-शार्दुलचे एकत्रित 5 बळी
मुंबई / वृत्तसंस्था
मागील हंगामात प्रारंभी नेतृत्वावरुन डच्चू देत नंतर संघातून बाहेर काढणाऱया सनरायजर्स हैदराबादची यंदा डेव्हिड वॉर्नरने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना गुरुवारी चांगलीच पिसे काढली. अवघ्या 58 चेंडूत नाबाद 92 धावांची झंझावाती खेळी साकारत वॉर्नरने आपला लौकिक अधोरेखित केला. शिवाय, एका अर्थाने हैदराबादविरुद्ध आपला जुना हिशेबही अगदी सव्याज चुकता केला!
वॉर्नर व रोव्हमन पॉवेल (35 चेंडूत नाबाद 67) यांची झंझावाती अर्धशतके व खलील अहमद-शार्दुलच्या एकत्रित 5 बळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध येथे 21 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला पाचारण केल्यानंतर दिल्लीने निर्धारित 20 षटकात 3 बाद 207 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात हैदराबादला 8 बाद 186 धावांवर समाधान मानावे लागले. या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेपावला आहे.
विजयासाठी 208 धावांचे कडवे आव्हान निकोलस पूरनच्या झंझावाती फलंदाजीमुळे तोकडे पडणार की काय, अशी शक्यता जरुर निर्माण झाली. पण, शार्दुलने पूरनला रोव्हमनकरवी झेलबाद केले आणि दिल्लीच्या मार्गातील महत्त्वाचा अडसर दूर झाला. निकोलसने या लढतीत 34 चेंडूत 2 चौकार, 6 षटकारांसह 62 धावांची आतषबाजी केली. शिवाय, मॅरक्रमने (42) त्याला समयोचित साथ देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
वॉर्नर-पॉवेलची फटकेबाजी
प्रारंभी, डेव्हिड वॉर्नर व रोव्हमन पॉवेल यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या बळावर दिल्लीने 3 बाद 207 धावांचा डोंगर रचला. वॉर्नरने हंगामातील चौथे अर्धशतक साजरे करताना आपल्या जुन्या प्रँचायझीविरुद्ध 58 चेंडूत 92 धावांची आतषबाजी केली तर पॉवेलने शेवटच्या टप्प्यात अधिक फटकेबाजी करत हैदराबादच्या गोलंदाजांचे पृथक्करण अक्षरशः बिघडून टाकले.
पॉवेल व वॉर्नर जोडीने 122 धावांची भागीदारी साकारताना शेवटच्या 5 षटकात तर 70 धावांची आतषबाजी केली. वॉर्नरने 12 चौकार व 3 षटकार खेचले. वॉर्नरची ही वैयक्तिक सर्वोत्तम खेळी ठरली. शिवाय, दिल्लीतर्फे हंगामातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली.
या हंगामात प्रतितास 154.8 किमीचा सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱया उमरान मलिकची वॉर्नरने केलेली धुलाई डोळय़ाचे पारणे फेडणारी होती. ऑस्ट्रेलियाच्या डावखुऱया सलामीवीराच्या या फटकेबाजीमुळे उमरानला 2 षटकांच्या आपल्या पहिल्या स्पेलमध्ये चक्क 32 धावा मोजाव्या लागल्या. पॉवेलनेही मलिकला शेवटच्या षटकात 3 चौकार व 1 षटकार फटकावला आणि या षटकात एकूण 19 धावा वसूल झाल्या. यापूर्वी गुजरातविरुद्ध 5 बळी घेणाऱया मलिकला येथे मात्र 52 धावा देऊनही एकही फलंदाज बाद करता आला नाही.
डावाच्या पहिल्या टप्प्यात सलामीवीर मनदीप सिंग शून्यावर बाद झाला तर मिशेल मार्शने सीन ऍबॉटकडे परतीचा झेल दिला. 10 षटकाअखेर दिल्लीने 3 बाद 91 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर वॉर्नर-रोव्हमन यांनी उर्वरित 10 षटकात आणखी जोरदार फटकेबाजी केली. रोव्हमन पॉवेलला 18 धावांवर असताना मलिकच्या गोलंदाजीवर केन विल्यम्सनने जीवदान दिले, ते हैदराबादसाठी महागडे ठरले.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली कॅपिटल्स : 20 षटकात 3 बाद 207 (डेव्हिड वॉर्नर 58 चेंडूत 12 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 92, रोव्हमन पॉवेल 35 चेंडूत 3 चौकार, 6 षटकारांसह नाबाद 67, रिषभ पंत 16 चेंडूत 26, मिशेल मार्श 10. अवांतर 12. भुवनेश्वर 1-25, सीन ऍबॉट 1-47, श्रेयस गोपाल 1-34).
सनरायजर्स हैदराबाद : 20 षटकात 8 बाद 186 (निकोलस पूरन 34 चेंडूत 2 चौकार, 6 षटकारांसह 62, एडन मॅरक्रम 25 चेंडूत 4 चौकार, 3 षटकारांसह 42, राहुल त्रिपाठी 18 चेंडूत 22, शशांक सिंग 10. अवांतर 11. खलील अहमद 3-30, शार्दुल ठाकुर 2-44, नोर्त्झे, मिशेल मार्श, कुलदीप यादव प्रत्येकी 1 बळी).
षटकात 23 धावा दिल्या. पण, पंतला बाद केले!
दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील नवव्या षटकात वॉर्नरने पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेतल्यानंतर स्ट्राईकवर आलेल्या रिषभ पंतने फिरकीपटू श्रेयस गोपालची सलग षटकार व एका चौकारासह जोरदार धुलाई केली. यातील पहिला षटकार स्क्वेअर लेगवरुन 91 मीटर्सचा होता. त्यानंतर दुसरा षटकार स्ट्रेटला तर 93 मीटर्सचा तिसरा षटकार लाँगऑफला फटकावला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर डीप पॉईंटकडे आणखी एक चौकार वसूल करत पंतने श्रेयसला आणखी जेरीस आणले. मात्र, जोरदार कव्हर ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात पंतने षटकातील शेवटचा चेंडू लेग स्टम्पवर ओढवून घेतला आणि त्याची 26 धावांची खेळी संपुष्टात आली.
निकोलस पूरन बाद झाला आणि हैदराबादचा संघर्ष संपुष्टात!
धुवांधार फलंदाजी साकारत निकोलस पूरन 34 चेंडूत 62 धावांची आतषबाजी करत असताना सनरायजर्स हैदराबादला विजयाची अपेक्षा होती. पण, डावातील 18 व्या षटकात पाचव्या स्टम्पवर फुलटॉस चेंडू फटकावण्याच्या प्रयत्नात पूरनचा अंदाज सपशेल चुकला आणि लाँगऑनवरील पॉवेलने सोपा झेल टिपत त्याची अर्धशतकी खेळी संपुष्टात आणली. पूरन बाद झाला, त्याचवेळी दिल्लीचा विजय सुनिश्चित झाला!