वृत्तसंस्था/ दुबई
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व वेस्ट इंडीजची अष्टपैलू हॅले मॅथ्यूज यांची नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्तम पुरुष व महिला क्रिकेटपटू बहुमानासाठी आयसीसीने निवड केली आहे.
पुरुषांचा टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियाने प्रथमच पटकावला, त्यात वॉर्नरची कामगिरी मोलाची ठरली होती. त्याने पाकिस्तानचा सलामीवीर अबिद अली व न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदी यांना मागे टाकत हा बहुमान मिळविला. विंडीजच्या हॅले मॅथ्यूजने वनडेमध्ये केलेली कामगिरी फायदेशीर ठरली. तिने पाकची डावखुरी स्पिनर अनाम अमिन व बांगलादेशची नाहिदा अख्तर यांना तिने मागे टाकत हा बहुमान मिळविला.
वॉर्नरला पहिल्यांदाच या बहुमानासाठी नामांकन मिळाले होते. त्याने टी-20 विश्वचषक स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार मिळविला होता. त्या स्पर्धेत त्याने उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध 49 व अंतिम लढतीत न्यूझीलंडविरुद्ध 53 धावा फटकावल्या होत्या. याशिवाय विंडीजविरुद्ध झालेल्या सुपर 12 सामन्यात त्याने 56 चेंडूत 89 धावा झोडपताना सामनावीराचा पुरस्कारही मिळविला होता. त्याने चार टी-20 सामन्यात 69.66 च्या सरासरीने 209 धावा जमविल्या होत्या.
हॅले मॅथ्यूजला दुसऱयांदा नामांकन मिळाले होते. यापूर्वी जुलैमध्येही तिला नामांकन मिळाले होते. पण त्यावेळी तिची सहकारी स्टेफनी टेलरने हा बहुमान पटकावला होता. तिने महिन्यात झालेल्या सामन्यांत 141 धावा आणि 13.11 च्या सरासरीने 9 बळी मिळविले. पाकविरुद्धच्या मालिकाविजयात तिने मोलाचा वाटा उचलला होता. तिने पहिल्या सामन्यात 57 धावा व 3 बळी तर दुसऱया सामन्यात 4 बळी मिळविले होते.
गेल्या जानेवारीपासून प्रत्येक महिन्याला हा बहुमान देण्याची पद्धत आयसीसीने सुरू केली असून यासाठी माजी खेळाडू, पत्रकार आणि जगभरातील क्रिकेटशौकिनांकडून झालेल्या मतदानाच्या आधारे खेळाडूंची निवड केली जाते.