प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना रूग्णांना बेडची माहिती देण्यासाठी प्रशासनाचे वॉर रूम खुल्या केल्या, पण येथे बेडसाठी येणाऱया फोनवरून धमकीची भाषाच ऐकायला मिळत आहे. बेड द्या.. अन्यथा पाहून घेईन, वॉर रूम कशाला केलीय.. माणसं मारायला केलीय का, पेशंटला काय झाल्यास तुम्हीच जबाबदार.. प्रश्न, प्रतिप्रश्न अन् दादागिरी ऐकून महिला स्टाफ बिथरला आहे, त्यापेक्षाही धमकीची भाषा ऐकून अधिकारीच राजिनामा देण्याच्या पावित्र्यात आहेत.
कोरोना रूग्णांना बेडची माहिती देण्यासाठी वॉर रूम सुरू झाल्या. सीपीआर हॉस्पिटल, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयात या वॉर रूममधील फोन, मोबाईल सतत खडखडत आहेत, 24 तास तेथे अधिकारी, कर्मचारी तैनात आहेत, पण गेल्या सप्ताहभरात वाढलेली रूग्णसंख्या अन् उपलब्ध बेडची कमतरता पाहता वॉर रूममधून रूग्णांच्या नातेवाईकांना `वेट अँड वॉच’चा सल्ला दिला जात आहे. बेड उपलब्ध झाल्यास कळवतो, असे सांगितले जात आहे.
सीपीआरमधील वॉर रूममध्ये दिवसभरात हजारभर फोन बेडसाठी येतात, येथे 480 बेड आहेत. त्यातील 450 बेड ऑक्सिजनेटेड आहे. व्हेटिलेटर, साधे बेड आहेत. गेल्या सप्ताहात नवे रूग्ण, कोरोना मृत्यूची संख्या वाढली. सीपीआर कोरोना आयसोलेटेड हॉस्पिटल आहे, पण तेथे संशयित रूग्ण घेतले जात नाहीत, बेडची माहिती दिली जात आहे. पण माहिती देणाऱया स्टाफलाच धमकीची भाषा वापरली जात आहे.
दोन दिवसांपुर्वी एका रूग्णासाठी जिल्हाध्यक्षाचा फोन आला, तो वॉर्डमधील स्टाफला, वॉर रूममधील स्टाफला अन् अधिकाऱयांनाही गेला. पण त्या रूग्णाची माहिती संबंधितांनाही नव्हती. रूग्ण संशयित आहे का, पॉझिटिव्ह, त्याची टेस्ट झालीय का, यापासून ते अनभिज्ञ होते, वॉर रूममधील या प्रश्नांना त्यांच्याकडे उत्तर नव्हते. फक्त पेशंट पाठवतोय, त्याला ऍडमिट करून घ्या, त्याला बेड न मिळाल्यास तुम्हीच जबाबदार.. हे दबावतंत्र त्यांनी वापरले. रूग्ण सीपीआरला आल्यास अन् तो संशयित, निगेटिव्ह असल्यास अन् पॉझिटिव्हच्या संपर्कात तो पॉझिटिव्ह आल्यास याला जबाबदार कोण, या डॉक्टरांच्या प्रश्नाला संबंधितांकडे उत्तर नव्हते, अन् त्यांनी हे सारं ऐकून रागानेच फोन ठेवून दिला.
जिल्हÎातील वरिष्ठ अधिकाऱयाच्या वर्तुळातील एकाला व्हेटिलेटर, ऑक्सिजन बेड हवा होता, पण व्हेटिंलेटर, ऑक्सिजन बेड फुल्ल होते, वरिष्ठांनी बेडसाठी वॉर रूमला फोन लावला, त्यांनी बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले. यावर त्राग्यातच त्यांनी `वॉर रूम काय माणसं मारायला केलीय का,’ असा प्रश्न करत फोन ठेवून दिला, अधिकारी, पदाधिकाऱयांच्या या दबावाचा त्रास वॉर रूममधील स्टाफला होतो आहे. या दादागिरीला कंटाळून अधिकाऱयाने राजिनाम्याचा पवित्राच घेतला आहे.