कोरोना नियमावलीची अंमलबजावणी होत नसल्याने संतप्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राज्यसभा सदस्यांनी अधिवेशन चालू असताना ‘टेबल हाऊस’कडे स्पष्टीकरण देण्यासाठी येऊ नये तसेच आपले आसन सोडून दुसऱया सदस्याच्या जवळ जाऊन कानात कुजबूज करू नये. जर विषय तातडीचा असेल, तर चिटोरा पाठवावा, अशा शब्दांत सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी कानउघाडणी केली.
अधिवेशन चालू असताना कोणत्याही सदस्याने ‘टेबल ऑफिस’मध्ये येऊ नये. त्यांनी दुसऱया सदस्यांच्या आसनाकडे जाऊ नये आणि त्यांच्या कानात कुजबुजण्याचा प्रकार टाळावा. संवाद साधण्यासारखे काही महत्त्वाचे असल्यास चिटोरे पाठवावेत, असे नायडू म्हणाले. परीक्षेच्या हॉलमध्ये एकमेकांना चिटोरे देण्याची परवानगी नाही. पण राज्यसभेत कोविड-19 च्या सुरक्षा उपायांचा विचार करून अन्य सदस्यांशी संपर्क साधण्यासाठी चिटोऱयांचे आदान-प्रदान करण्यास परवानगी आहे, असाही टोला त्यांनी ‘शून्य प्रहर’ची कार्यवाही सुरू होण्यापूर्वी हाणला.
नायडू यांनी खासदारांना आपल्या कार्यालयात न येण्याचा सल्लाही दिला. लोकांची भेट घेताना आपल्याला आनंद होत असतो. पण सध्याच्या परिस्थितीत सुरक्षेचे नियम पाळले पाहिजेत. बंद खोल्यांमध्ये हवा मर्यादित प्रमाणात खेळत असते, याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांनी गुदमरल्यासारखे होते असे सांगून बोलताना मास्क काढण्याची परवानगी मागितली असता सभागृहात असताना सदैव मास्क परिधान करून वावरा, असे नायडू यांनी बजावले.