कॅन्टोन्मेंटची ‘ई-छावणी’प्रणाली कार्यान्वित, तक्रारीही ऑनलाईन स्वीकारणार
प्रतिनिधी/ बेळगाव
विविध सरकारी कार्यालयांतील कामकाज ऑनलाईन करून पेपरलेस कारभार करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कॅन्टोन्मेंट बोर्डनेदेखील ‘ई-छावणी’ या नावाने ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. जनतेला या पोर्टलच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तक्रारी व व्यवसाय परवान्याकरिता व इतर कामासाठी ‘ई-छावणी’ ऑनलाईनद्वारा अर्ज करण्याचे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डने केले आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सर्वसाधारण बैठकीत प्रामुख्याने ‘ई-छावणी’ ऑनलाईन सुविधेची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने चर्चा करण्यात आली. सध्या सर्वच कार्यालयात ऑनलाईन कामकाज सुरू आहे. महापालिकेत ऑनलाईन इमारत बांधकाम परवाना, कर भरणा तसेच विविध अर्जदेखील ऑनलाईनद्वारा स्वीकारण्यात येत आहेत. त्या धर्तीवर आता संरक्षण खात्यानेही कॅन्टोन्मेंट बोर्डचे कामकाज ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुविधेची अंमलबजावणी करण्याची सूचना पुणे सदर्न कमांडने कॅन्टोन्मेंट बोर्डला केली आहे. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने या विषयावर चर्चा केली. कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांना पुरविण्यात येणाऱया सर्व सुविधा संगणकीकृत करण्यात येणार आहेत. प्रत्येक कामासाठी नागरिकांना कार्यालयाच्या पायऱया झिजविण्याची गरज नाही. ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून कॅन्टोन्मेंटवासियांना घरबसल्या विविध अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेऊन ‘ई-छावणी’ प्रणालीद्वारे कामकाज करण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली.
आठवडाभरातच ‘ई-छावणी’ प्रणालीची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील सर्व प्रकारच्या समस्यांची तक्रार ऑनलाइनद्वारा करण्याची मुभा राहणार आहे. इमारत बांधकाम परवाना, व्यवसाय परवाना आणि कर भरणा करणे आदी विविध कामांकरिता ‘ई-छावणी’ ऑनलाईन प्रणालीद्वारा घरबसल्या अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील नागरिकांनी ऑनलाईन प्रणालीचा लाभ घेऊन समस्यांच्या तक्रारी आणि व्यवसाय परवान्याकरिता अर्ज करावेत, असे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बर्चस्वा यांनी केले आहे.