पंधरा दिवसात राबविलेल्या मोहिमेद्वारे दंड वसूल : मनपाच्यावतीने मोहीम सातत्याने राबविणार
प्रतिनिधी / बेळगाव
विनापरवाना व्यावसायिकांचा शोध घेऊन दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम महापालिकेच्या आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. शहरातील विविध भागातील व्यावसायिकांकडे व्यवसाय परवान्याची विचारणा केली असता व्यवसाय परवाने नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. मागील 15 दिवसांपासून राबविण्यात आलेल्या मोहिमेच्या माध्यमातून 11 लाख रुपये शुल्क वसूल करण्यात आला.
महापालिकेकडून व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. शहरात असंख्य व्यवसाय असून, अनेक व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही व्यावसायिकांनी परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. 2014-15 पासून चार हजारहून अधिक व्यवसाय परवान्यांचे नूतनीकरण झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्या नेतृत्वाखाली पथकाची नियुक्ती करून व्यवसाय परवान्याची तपासणी करण्यात येत आहे.
मागील 15 दिवसांपासून ही मोहीम शहराच्या विविध भागात राबविण्यात येत आहे. किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार अशा महत्त्वाच्या गल्ल्यांमधील व्यावसायिकांच्या परवान्यांची तपासणी करण्यात आली. असंख्य व्यावसायिकांनी विनापरवाना व्यवसाय थाटल्याचे निदर्शनास आले. काही व्यावसायिकांनी परवाने नूतनीकरण केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे पाहणीवेळी व्यावसायिकांकडून दंड वसूल करण्यात आला. तातडीने अर्ज करून व्यवसाय परवाना घेण्याची सूचना करण्यात आली होती.
व्यवसाय परवाना तपासणी मोहिमेमुळे शहरातील व्यावसायिक खडबडून जागे झाले असून तो घेण्यासाठी यांनी महापालिकेकडे धाव घेतली आहे. त्यामुळे मागील 15 दिवसात व्यवसाय परवाना दंड व परवाना शुल्कच्या माध्यमातून महापालिकेकडे 11 लाखाचा महसूल जमा झाला असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली.
व्यवसाय परवाना नूतनीकरण न केलेल्या आणि विनापरवाना व्यावसायिकांचा शोध घेण्याची मोहीम मनपाच्यावतीने सातत्याने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी व्यवसाय परवाना घ्यावा, तसेच व्यवसाय परवान्याचे नूतनीकरण करावे, असे आवाहन केले आहे.