अमृता घोलबा-सुंठणकर यांचे प्रतिपादन : जीआयटी एमबीएतर्फे व्याख्यान
प्रतिनिधी /बेळगाव
उद्योग क्षेत्राबरोबर शैक्षणिक संवाद साधण्यासाठी व बाजारातील गरजा समजून घेण्यासाठी गोगटे इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एमबीए विभागात फूड बँक ऑफ इंडिया रेस्टो-कॅफेच्या सहसंस्थापिका अमृता घोलबा-सुंठणकर यांचे ‘इंपॉर्टन्स ऑफ सर्व्हिसेस मार्केटिंग’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अमृता यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सर्व्हिसेस मार्केEिटगबद्दल सर्व बारकाव्यानिशी माहिती सांगितली. त्यांनी सर्व्हिस मार्केटिंगमधील उत्पादन, स्थान, किंमत, जाहिरात, लोक, प्रक्रिया व भौतिक पुरावे या तांत्रिक संकल्पनांवर चर्चा केली. त्यांनी एक उद्योजिका होण्यापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाबद्दल व आलेल्या अनुभवांबद्दल सांगितले. व्यवसाय यशस्वी होण्यासाठी कोणतीच परिपूर्ण अशी योजना नसते. प्रत्येकाला आपल्या मागील अनुभवातून शिकावे लागते, असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. जयंत कित्तूर यांनी केएलएस व्यवस्थापनाचे अशा शैक्षणिक उपक्रमांना सतत पाठिंबा दिल्याबद्दल व विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रगत व अनुकूल वातावरण उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. एमबीए विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. एल. दास यांनी आपल्या स्वागतपर भाषणात यशस्वी लोकांशी संवाद साधणे ही सर्वात मोठी प्रेरणा असते. संस्था जेव्हा अशा सत्रांचे आयोजन करते तेव्हा विद्यार्थ्यांना अनेक मार्गांनी फायदा होत असतो, असे मत मांडले.