नवी दिल्ली / वृत्तसंस्था
वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने ‘ईज ऑफ डूईंग’मधील राज्यांची क्रमवारी शनिवारी जाहीर केली. या क्रमवारीत आंध्रप्रदेशला पुन्हा एकदा पहिले स्थान मिळाले. ईशान्य राज्यांमध्ये आसामने चांगली कामगिरी केली आहे. उत्तर प्रदेशने 10व्या क्रमांकावरून दुसऱया स्थानी झेप घेतली आहे. व्यवसाय करण्याच्या सुलभतेच्या बाबतीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी अशाप्रकारची यादी 2018 मध्ये प्रसिद्ध झाली होती.
मंत्रालयाने जाहीर केलेल्या क्रमवारीत उत्तर प्रदेश दुसऱया क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशने तेलंगणाला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले. सध्याच्या क्रमवारीत तेलंगणा तिसऱया क्रमांकावर आणि मध्य प्रदेश चौथ्या क्रमांकावर आहे. यावेळी हरियाणाला पहिल्या दहामध्ये स्थान मिळालेले नाही, तर 2018 मध्ये जाहीर झालेल्या क्रमवारीत हे राज्य दुसऱया क्रमांकावर होते. चर्चेत असलेले गुजरात मॉडेल यावेळेस या यादीमध्ये स्थान मिळवू शकले नाही. तसेच सध्याच्या क्रमवारीत गुजरातप्रमाणेच महाराष्ट्राला पहिल्या दहामध्ये स्थान मिळालेले नाही.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे. रँकिंगची ही चौथी आवृत्ती असून ती वर्ष 2019 साठी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यावेळी उपस्थित होते. यावेळी पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, आसाम आणि दिल्ली यांनाही व्यवसाय सुधार कृती योजनेत (बीआरपी) क्रमवारीत स्थान देण्यात आले आहे. यात सध्याच्या क्रमवारीत मध्यप्रदेशला तिसरा क्रमांक मिळाला आहे. त्याचबरोबर ईशान्य राज्यांमध्ये आसामची उत्कृष्ट कामगिरी आहे.
या मापदंडांवर ठरते क्रमवारी
देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी व्यवसायाच्या वातावरणात सुधारणा करण्यासाठी राज्यांमधील स्पर्धा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. बांधकाम परवाने, कामगार कायदे, पर्यावरणीय नोंदणी, माहितीचे एकत्रीकरण व सादरीकरण, जमिनीची उपलब्धता आणि एकल खिडकी प्रणाली यावर आधारित राज्य रँकिंग मोजले जाते.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी इझ ऑफ डोईंग रँकिंग व्यवसाय सुधार व कृती योजनेंतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (डीपीआयआयटी) आयोजित करतात. रँकिंग अखेर जुलै 2018 मध्ये प्रसिद्ध झाली होती. या रँकिंग क्रमवारीत आंध्र प्रदेश अव्वल होता. तर तेलंगणा आणि हरियाणा अनुक्रमे दुसऱया आणि तिसऱया क्रमांकावर होते.