प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे सर्वसामान्य जनता विविध समस्यांना तोंड देत आहे. सरकारने उपचार करण्यासाठी कंबर कसली आहे. लॉकडाऊन काळात मास्क, सॅनिटायझर वापरण्याबरोबरच काही भागात निर्बंध लागू केले आहेत. मात्र दारू दुकाने सुरू केली आहेत. त्यामुळे तरुणवर्ग पुन्हा व्यसनाच्या आहारी गेला आहे. त्यामुळे कुटुंबाची मोठी हानी होत आहे. तेव्हा तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे, याचबरोबर सरकारनेही व्यसनांवर निर्बंध घालण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी लिंगायत धर्म महासभा आणि राष्ट्रीय बसव दल यांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गरीब कुटुंबांना लॉकडाऊन काळात विविध समस्या भेडसावत आहेत. या कोरोनामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. यातच मद्यपानसारख्या व्यसनाकडे मद्यशौकीन वळत आहेत, ही बाब गंभीर आहे. मद्यपान सुरू करण्यास सरकारनेच मुभा दिली. मात्र, यामुळे गरीब कुटुंबांना मोठा त्रास होत आहे. तेव्हा दारू दुकाने तसेच इतर अमलीपदार्थविरोधात कठोर कारवाई करावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.
कोरोनामुळे सर्वच व्यवस्था कोलमडली आहे. सर्व जण मानसिक तणावाखाली आहेत. यातूनच अनेक जण व्यसनाच्या आहारी जात आहेत. मात्र, तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचे मार्गदर्शन करावे, असे म्हटले आहे. यावेळी बेळगाव जिल्हा लिंगायत महासभेचे अध्यक्ष महांतेश गुडूस, के. बसवराज यांच्यासह लिंगायत समाजातील नागरिक उपस्थित होते.