प्रतिनिधी/ सातारा
व्याजाने घेतलेल्या पैशाच्या व्यवहारातून खाजगी सावकाराने चक्क दीड महिन्याच्या मुलीचेच अपहरण केल्याची घटना सातारा शहरात सदरबझार परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे. तक्रारदार सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रारीकरता गेले होते. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला असून या अनुषंगाने सातारा शहर पोलीस चौकशी करत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, मंगळवार पेठेतल्या ढोणे कॉलनीत अभिषेक कुचेकर याने आर्थिक अडचणीमुळे सदरबझार येथील संजय बाबर व अश्विनी पवार-बाबर यांच्याकडून गतवर्षी 30 हजार रुपये घेतले. त्यानंतर एका वर्षात 60 हजार रुपये परत केले. तरीही बाबर यांच्याकडून पैशाचा सतत तगादा लावला होता. गत चार महिन्यापूर्वी कुचेकर यांची दीड महिन्याची मुलगीच बाबर दाम्पत्याने घरात येऊन दीड महिन्याची मुलगीच घेऊन गेले. त्यानंतर वारंवार बाबर याच्याकडे मुलगी आणण्यासाठी गेले परंतु बाबर याने जीवे मारण्याची धमकी देत पाच लाख रुपये द्या अन् मुलीला घेऊन जा, अशी मागणी केली आहे. याबाबत शहर पोलिसांकडे कुचेकर यांनी कैफियत मांडली असून त्या अनुषंगाने पोलीस चौकशी करत आहेत. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, असे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.