सुपारी घेणारे सांगलीचे चौघे ताब्यात, एलसीबीची कारवाई
प्रतिनिधी/ कराड
येथील ट्रक व्यापाऱयाला संपवण्यासाठी 50 हजारांची सुपारी सांगली जिह्यातील चौघांनी घेतली होती. सत्तूर, दांडकी घेऊन व्यापाऱयावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या चौघांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी मुसक्या आवळल्या. या कारवाईने खळबळ उडाली असून नेमके प्रकरण काय आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
केरोबा बापू मेटकरी (वय 23, रा. कुपवाड रोड, सिद्धनाथ कॉलनी, ता. मिरज), सलिम आप्पालाल नदाफ (वय 22, रा. अष्टविनायक नगर कुपवाड रोड, विश्रामबाग ता. मिरज), कुमार सोपान कोळी (वय 24, रा. गजराज कॉलनी, विश्रामबाग ता. मिरज), प्रदीप बाळू माळी (वय 24, रा. मंगलमूर्ती कॉलनी कुपवाड, ता. मिरज) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जिह्यात खंडणी, मालमत्तेसाठी धमक्यांची प्रकरणे वाढू नयेत, या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी कारवाईच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांचे पथक कराड परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते.
दरम्यान कराड येथील ट्रान्सपोर्ट व्यापाऱयाला मारण्याची सुपारी त्यांच्याच गावातील एकाने दिली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. पूर्वी झालेल्या भांडणावरुन सांगली येथील युवकांना 50 हजारांची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार संशयितांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सापळा रचला होता. दरम्यान सुपारी घेतलेले संशयित युवक महामार्गाजवळ गोटे गावच्या हद्दीत हॉटेल रॉयल पॅलेसच्या समोर दुचाकीवर अंधारात दबा धरुण बसल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी त्या परिसरात छापा टाकून संशयितांना पकडले. मात्र यातील दोघे कोल्हापूर बाजूकडे पसार झाले. पकडलेल्या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी, कराड व आटपाडी येथील इसमांच्या सांगण्यावरुन कराड येथील ट्रक व्यापाऱयास मारण्यासाठी 50 हजाराची सुपारी घेतल्याचे सांगितले. पळून गेलेल्या दोन संशयितांना पाचवड फाटय़ावरुन ताब्यात घेतले. संशयितांकडून दोन मोटार सायकल, सत्तुर, तीन लाकडी दांडके,
मोबाईल फोन असा एकुण 1 लाख 64 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सहाय्यक निरीक्षक आनंदसिंह साबळे, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, शरद बेबले, साबिर मुल्ला, प्रवीण फडतरे, गणेश कापरे, केतन
शिंदे, रोहित निकम, संकेत निकम, मयुर देशमुख, मोहसीन मोमीन, महेश पवार, संजय जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.