वार्ताहर / मायणी :
मायणी येथील मुख्य बाजारपेठेतील यशवंत बाबामंदिर परिसरात सोनेचांदीच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र, दुकान मालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवत केलेल्या विरोधामुळे दरोडेखोरांना पलायन करावे लागले. या घटनेदरम्यान दरोडेखोरांनी दुकान मालकावर बंदूक रोखल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेबाबत व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही व्हिडिओद्वारे व दुकानदारांकडून मिळालेली माहिती अशी, मायणी येथील बालाजी ज्वेलर्सचे मालक अमित माने हे आपल्या सराफा दुकानात गुरुवारी रात्री 8 .30 वाजल्याच्या सुमारास हिशोबाचे काम करीत बसले होते. त्यावेळी काही युवकांनी तोंडाला रुमाल बांधून दुकानात प्रवेश केला. व चर्चा करताना दुकान मालकाच्या कॉलरला पकडून बंदूक दाखवून धमकवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान दुकान मालकाने आरडाओरडा करीत दरोडेखोरांना प्रतिकार केल्याने दरोडेखोरांना दुकानातून पलायन करावे लागले. दरम्यान, दुकान मालकांनी व ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरटे पलायन करण्यात यशस्वी झाले. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलीस स्टेशनमध्ये झाली नव्हती.