प्रतिनिधी/ पणजी
पणजी शहरातील व्यावसायिक अस्थापने, उद्योग यांचे कर (घरपट्टी) कमी करण्याचा प्रस्ताव पणजी महानगरपालिकेने आखला असून तो मान्यतेसाठी सरकारकडे पाठवला आहे. तसेच त्या करातून मंदिर, मशीद, चर्च अशी सर्व प्रार्थनास्थळे वगळण्याची तरतूद प्रस्तावात असून सरकारने मंजुरी दिल्यानंतर त्याची कार्यवाही होणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रस्तावाचे व्यावसायिकांनी स्वागत केले असून अंमलबजावणी लवकरात लवकर करावी असे सूचविले आहे.
कर कमी करावेत अशी मागणी व्यावसायिक वर्गातून करण्यात येत होती. त्याची दखल पणजी मनपाने प्रामुख्याने घेऊन कर (घरपट्टी) कमी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
कोरोना संकटामुळे अनेक उद्योगात, व्यवसायात मंदी आली असून त्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने कर कमी करावेत अशी त्यांची मागणी होती. त्यानुसार प्रती चौरस मीटर प्रमाणे असलेली दर आकारणी कमी करण्यात येणार आहे. वर्ष 2016 नंतर ज्या उद्योगांना, आस्थापनांना ताबा प्रमाणपत्र (ऑक्युपन्सी सर्टिफ्ढिकेट) मिळालेले आहे त्यांनाच या कमी झालेल्या कराचा लाभ होणार आहे. हा नवा कर प्रस्ताव असून तो मान्यतेसाठी नगरपालिका प्रशासन संचालनालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती मनपा सूत्रंानी दिली.
या प्रस्तावानुसार कर (घरपट्टी) 50 टक्के कमी करावी अशी तरतूद आहे. सध्या पणजी मनपाचा महसूल कमी झाल्यामुळे हा प्रस्ताव राज्य सरकार मान्य करेल की नाही याबाबत श्ंाका आहे. परंतु सध्याच्या दर आकारणी प्रमाणे घरपट्टी भरली जात नाही आणि ती भरणे शक्य होत नाही अशी वस्तूस्थिती असल्याचे सांगण्यात आले. आगामी मनपाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.