सोने गुंतवणूकीत दुप्पट परतावा देण्याचे अमिष, हैद्राबाद येथील ठकसेनावर दुसरा गुन्हा दाखल
प्रतिनिधी/कोल्हापूर
सोन्याच्या गुंतवणूकीमध्ये दुप्पट परतावा देण्याच्या अमिषाने कोल्हापूरातील व्यावसायीकाची 18 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात मीर सरफराज अली (वय 48 रा. चारमीनार, तेलगंणा, हैद्राबाद) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद किसन तातोबा खंदारे (वय 52 रा.नागाळा पार्क, कोल्हापूर) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली. मीर सरफराज सध्या फसवणूक प्रकरणी जुना राजवाडा पोलीसांच्या ताब्यात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आपण दुबईमध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करतो. यातून चांगला नफा मिळवतो. असे सांगून मीर अलीने किसन खंदारे यांचा विश्वास संपादन केला. सध्या लॉकडाउन असल्याने भारतातूनच व्यवहार करत असल्याचेही सांगितले. तुम्हीही सोन्यामध्ये गुंतवणूक करा चांगला परतावा देतो असा बहाण करुन किसन खंदारे यांच्याकडून 23 ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 या कालावधीत 18 लाख रुपये उकळले. यानंतर खंदारे यांनी मीर अली सोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तसेच गुंतवणूकीची रक्कमही देण्यास नकार दिला. यामुळे फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीपुरी पोलीस करत आहेत.