संगणक क्रांती कितीही मोठय़ा प्रमाणात झाली असली तरी टीव्हीवर वृत्ते देण्याचे काम मानवी अँकरलाच करावे लागते अशी आपली समजूत आहे. वृत्तांचे वाचन असो किंवा टीव्ही एकाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असो, त्यासाठी सूत्रधार किंवा अँकर हा आवश्यकच असतो आणि तो एक नैसर्गिक मानवच असतो.
तथापि, चीनमध्ये आता आभासी न्यूज अँकरचा जन्म झाला आहे. ही अँकर हुबेहुब एखाद्या नैसर्गिक महिलेसारखी दिसते आणि तिचे हावभावही तसेच असतात. शिवाय ती आभासी असल्याने वर्षाचे 365 दिवस आणि दिवसाचे 24 ही तास ती एकटीच वृत्तांचे सादरीकरण करते. तिला विश्रांतीची आवश्यकता नाही.
या महिलेची माहिती ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाईटने प्रसारित केली आहे. ही अँकरची निर्मितीं कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात आली असून ती स्टेट मिडिया आऊटलेट्स पीपल्स डेली या संस्थेने निर्माण केली आहे. या आभासी अँकरशी लोक कोणत्याही विषयांवर बोलू शकता. तसेच तिने भूतकाळात कोणत्याही विषयावर वृत्त दिले असेल तर ते केव्हाही पुन्हा पाहिले जाऊ शकते. या अँकरला जो फीडबॅक दिला जातो तोही ती स्वीकारते आणि त्याचे योग्य प्रकारे विश्लेषण करुन वृत्त प्रसारित करते. हे काम ती एखाद्या मानवासारखेच सहजगत्या करते, असे दिसून येते. ही आश्चर्यकारक निर्मिती मानली जात आहे.