वाराणसीतील डॉक्टरांसह प्रंटलाईन वर्कर्सशी साधला संवाद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरातील विविध यंत्रणांना सतर्क करण्याचे तसेच आढावा घेण्याचे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने सुरू आहेत. पंतप्रधान मोदी दररोज विविध घटकांशी व्हर्च्युअल पद्धतीने व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत असतात. शुक्रवारीही त्यांनी उत्तर प्रदेश-वाराणसीमधील डॉक्टरांशी संपर्क साधला. या बैठकीमध्ये बोलत असताना पंतप्रधान भावुक झाल्यानंतर त्यांच्या डोळय़ांमधून अश्रू तरळल्याचे दृश्य दिसून आले.
वाराणसीमधील डॉक्टरांशी संवाद साधत असताना कोरोना महामारीमुळे निधन झालेल्यांविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी भावुक झाले. ‘विषाणूमुळे आपल्यातून अनेक प्रियजन दूर गेले आहेत. मी त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो.’ असे पंतप्रधान म्हणाले. याचवेळी त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
कोरोनाच्या दुसऱया लाटेत एकाच वेळी आपण अनेक आघाडय़ांवर लढत आहोत. संसर्गदर जास्त आहे. तसेच रुग्ण बऱयाच दिवसांपासून रुग्णालयात आहेत. आता आपल्याला वाराणसी तसेच पूर्वांचलच्या ग्रामीण परिसरात लक्ष द्यावे लागेल. ‘जहाँ बीमार, वहीं उपचार’ आता आपला मंत्र असणार आहे. असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. ‘लसीकरणाला आपल्याला लोकअभियानाचे रुप द्यायला हवे. सध्या कोरोनाच्या उपचारासोबतच म्युकरमायकोसिसचे आव्हान भारतासमोर उभे ठाकले आहे. त्यासाठी व्यवस्था तयार करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे’, असेही मोदी यावेळी म्हणाले.