वार्ताहर / पुलाची शिरोली
कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योजक आणि शिरोली औद्योगिक वसाहतीमधील व्हर्सटाईल ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन प्रभाकर ऊर्फ सुनील विठ्ठल जनवाडकर यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते 66 वर्षांचे होते.
चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत कार्यकर्तृत्वामुळे सुनील जनवाडकर यांनी कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र उद्योगक्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटविला. वडील विठ्ठल जनवाडकर यांनी बागल चौकांमध्ये सुरू केलेल्या छोटय़ाशा व्यवसायाचे रुपांतर त्यांनी मोठय़ा कंपनीत करून 1980 साली शिरोली एमआयडीसी येथे व्हर्सटाईल इंजिनियर्सची स्थापना केली. सुरुवातीपासूनच दूरदृष्टी असलेल्या जनवाडकरांनी कास्टिंगची गरज लक्षात घेऊन पुढे कास्ट आयर्न फाउंड्री स्थापन केली. याचबरोबर 1987 मध्ये प्रभा इंजिनियर्स या मशिन शॉपचीही स्थापना केली. काळानुरूप नवनवीन बदल स्वीकारत त्यांनी 2010 मध्ये व्हर्सटाईल आलुकास्ट प्रा. लि या अल्युमिनियम फौंड्री आणि मशिन शॉपची उभारणी केली. ग्राहकांचा प्रतिसाद आणि जागतिक बजारपेठांमधील त्यांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी 2018 ला बेळगाव येथे व्हर्सटाईल इंडस्ट्रीज या कास्ट आयर्न फौंड्रीची निर्मिती केली. नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि बाजारपेठांमधील मागणी यांचा अभ्यास करून प्रगतीचा हाच आलेख कायम ठेवत त्यांनी नुकतीच 2021 मध्ये होनगा बेळगाव येथे व्हर्सटाईल इंडस्ट्रीजच्या दुसऱया युनिटची स्थापना केली. त्यांच्या जाण्याने व्हर्सटाईलग्रुप ऑफ कंपनीजमध्ये कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, स्नुषा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.