हवेत वेगाने फैलावण्यास सक्षम – भारत अन् ब्रिटनमधील स्ट्रेनशी मिळताजुळता
वृत्तसंस्था / हनोई
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांदरम्यान व्हिएतनाममध्ये विषाणूच्या नव्या व्हेरियंटची पुष्टी झाली आहे. हा विषाणू हवेत वेगाने फैलावत असल्याचा दावा आहे. या व्हेरियंटमध्ये भारत आणि ब्रिटनमध्ये मिळालेल्या बी.1.617 शी मिळतेजुळते स्ट्रेन आहेत. वैज्ञानिकांनी अलिकडेच संक्रमित झालेल्या काही रुग्णांना संसर्ग देणाऱया विषाणूची जेनेटिक स्टडी केली आहे. यात या नव्या स्ट्रेनची पुष्टी झाल्याचे व्हिएतनामचे आरोग्यमंत्री गुयेन थान लॉन्ग यांनी सांगितले आहे.
कोरोनाचा हा व्हेरियंट गळय़ात वेगाने पुढे जातो आणि परिसरात अत्यंत जलदपणे फैलावतो असे सांगण्यात आले. पण व्हिएतनाममध्ये या नव्या व्हेरियंटचे किती रुग्ण सापडले हे लॉन्ग यांनी सांगितलेले नाही. देशात आतापर्यंत 7 व्हेरियंट फैलावले होते.
देशात वाढत्या रुग्णांमागे नवा व्हेरियंट जबाबदार असू शकतो, देशाच्या 30 हून अधिक भागांमध्ये तो फैलावला आहे. यामुळे अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत. काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रमानंतर रुग्ण वाढल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावरही बंदी घालण्यात आली आहे. बहुतांश मोठय़ा शहरांमध्ये गर्दी करण्यास मनाई आहे. उद्याने, रेस्टॉरंट, बार, क्लब आणि स्पा बंद करण्यात आले आहेत.
9.7 कोटी लोकसंख्या असलेल्या व्हिएतनाममध्ये सध्या ऍस्ट्राजेनेका-ऑक्सफोर्डची लस देण्यात येत आहे. येथे आतापर्यंत 10 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. अमेरिकेची कंपनी फायजरसोबत 3 कोटी डोससाठी देशाने करार केला आहे. तसेच मॉडर्नासोबत देखील करार होण्याची अपेक्षा आहे.
देशात आतापर्यंत कोरोनाचे 6908 रुग्ण सापडले असून यातील 47 जणांना जीव गमवावा लागला आहे. यातील बहुतांश रुग्ण मे महिन्यात सापडल्याने भीती निर्माण झाली आहे. देशातील सक्रीय रुग्णसंख्या सध्या 3,965 आहे.
कोरोनाची पहिली लाट रोखण्यासाठी व्हिएतनाममध्ये अवलंबिलेल्या रणनीतिचे जगभरात कौतुक झाले होते. चीनमधून पसरलेला विषाणू शेजारी देश असलेल्या व्हिएतनाममध्ये फैलावू शकला नव्हता. तेथील सरकारने प्रारंभीच मोठय़ा प्रमाणावर क्वारंटाईन आणि कठोर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले होते. याचमुळे तेथे पहिली लाट धोकादायक ठरली नव्हती.