विविध मान्यवरांची श्रद्धांजली
प्रतिनिधी /पणजी
बांधकाम क्षेत्रात लौकिक प्राप्त केलेले तसेच आदरातिथ्य आणि वैद्यकीय क्षेत्रातही भरीव योगदान दिलेले प्रसिद्ध उद्योजक व्हिक्टर आल्बुकर्क यांचे अल्प आजारानंतर रविवारी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते.
आल्कॉन व्हिक्टर ग्रूपचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या आल्बुकर्क यांनी बांधकाम, आदरातिथ्य उद्योग तसेच वैद्यकीय क्षेत्रात घवघवीत यश कमावले आहे. मडगाव येथील अपोलो व्हिक्टर सुपर स्पेशालिटी इस्पितळामुळे ते सर्वाधिक लोकप्रिय झाले. राज्याच्या विविध भागात त्यांची हॉटेल्स आहेत.
आल्बुकर्क हे मूळचे पणजीतील असून आल्तीनो येथे राहात होते. अलिकडे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांच्यावर मडगाव येथे व्हिक्टर इस्पितळात उपचार सुरू होते. तेथेच रविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पश्चात पत्नी सिल्विया, दोन पूत्र आणि सुना असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल राज्यातील विविध मान्यवर तसेच प्रतिष्ठित व्यक्तींनी दुःख व्यक्त करून दूरदृष्टी असलेल्या एका उद्योजकास गोवा मुकला आहे, अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे.