प्रतिनिधी/ बेळगाव
बदलत्या तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने तंत्रज्ञानाशी निगडीत काही महत्त्वाचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याची कार्यवाही नूतन शैक्षणिक वर्षापासून होणार आहे.
बी टेक ईन कॉम्प्युटर सायन्स ऍण्ड बिझनेस सिस्टीम्स, बी टेक ईन मेकॅनिकल ऍण्ड स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि बी टेक ईन रोबोटिक ऍण्ड ऑटोमेशन असे हे अभ्यासक्रम आहेत. एआयसीटीई म्हणजेच अखिल भारतीय तांत्रिक महामंडळाने या अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. या अभ्यासक्रमांसाठी आरएनडी म्हणजे संशोधन आणि विकास या क्षेत्रात काम करणाऱया संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. टीसीएस म्हणजे टाटा कन्सल्टींग सर्व्हिसेस आणि कन्सल्टींग व बिझनेस सोल्युशन ऍण्ड सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी सेक्टर या दोन संस्थांसमवेत व्हीटीयूने करार केला आहे. करारानुसार या दोन्ही संस्था प्रथम प्राध्यापकांना प्रशिक्षण देतील, तसेच या क्षेत्रातील तज्ञ प्राध्यापक उपलब्ध करून देतील. प्रत्येक विभागासाठी 30 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
बी टेक ईन कॉम्प्युटर सायन्स ऍण्ड बिझनेस सिस्टिम्सअंतर्गत अनॅलिटिक्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बौद्धिक संपदा यावर आधारित अभ्यासक्रम असून आयटी क्षेत्राला उपयुक्त ठरतील, असे विद्यार्थी तयार करण्याचे ध्येय आहे. टीसीएसतर्फे विद्यार्थ्यांना इंटर्नशिप ही देणार आहे. मेकॅनिकल ऍण्ड स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग अंतर्गत 21 व्या शतकाची गरज लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेत इंजिनिअर तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे.
उत्पादन प्रक्रिया, उत्पादन पद्धत आणि संलग्न अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. बी टेक रोबोटिक्स ऍण्ड ऑटोमेशनमध्ये तंत्रज्ञानाचा पुरेपूर लाभ घेत रोबोटिक्स इंजिनिअर, रोबोटिक वेल्डिंग, मोबाईल रोबोटिक या अभ्यासक्रमांवर भर दिला जाणार आहे. विविध आस्थापनांमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाचा अवलंब वाढत आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कृषी, खाण, अवकाश, आरोग्य आणि लष्करासह विविध क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत. एकूणच या अभ्यासक्रमांमध्ये व्यवस्थापन विज्ञान, मानवाधारित कौशल्य व मानवी मूल्ये यांच्यावर भर देण्यात आला आहे.