बुडीत खात्यात जाण्याचा धोका नाही : संचालक मंडळाचे भागधारकांना आवाहन
प्रतिनिधी / फोंडा
व्हीपीके अर्बन संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असून ग्राहकांनी गुंतवलेले पैसे बँकेकडे सुरक्षीत आहेत. सरकारने लागू केलेल्या तत्पुरत्या आर्थिक निर्बंधामुळे बँक बुडीतखात्यात जाण्याचा कुठलाही धोका नाही. ग्राहकांनी संयम बाळगावा असे आवाहन व्हीपीके अर्बन संस्थेचे अध्यक्ष सुर्या गावडे व संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
कर्जावरील थकबाकी लवकरात लवकर वसूल करुन वाढलेला एनपीए कमी करण्याचा प्रयत्न चालला असून जूनच्या पहिल्या आठवडय़ात त्यासंबंधी सरकारला कृती आराखडा सादर केला जाणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
व्हीपीकेच्या म्हार्दोळ येथील मुख्यालयात काल मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग गावडे, व्यवस्थापकीय संचालक अशोक गावडे व अन्य संचालक उपस्थित होते.
सहकार खात्याने 5 जून रोजी व्हीपीके संस्थेवर जे आर्थिक निर्बंध लागू केले, ते तातडीने मागे घेतले जावेत यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सहकारमंत्री गोविंद गावडे यांच्याशी चर्चा झाली आहे. तसेच सहकार निबंधकांना त्यासंबंधी लेखी स्पष्टीकरणही दिलेले आहे.
सन 2012 मध्ये झालेल्या खाणबंदीनंतर जी ओटीएस योजना लागू करण्यात आली, त्यामुळे व्हीपीकेला रु. 12 कोटींचा फटका बसला. सन 2016 मधील नोटबंदी व गेल्या तीन महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे बँकेच्या कर्ज वसुलीवर परिणाम झाला. कर्जवसूली थकल्याने जो एनपीए वाढला तो कमी करण्यासाठी संस्था तातडीने पावले उचलणार आहे. ग्राहकांच्या गुंतवणूकीतील तसेच बचत व अन्य खात्यातील एकही पैसा बुडणार नाही याची हमी संस्था देत असल्याचे सुर्या गावडे यांनी सांगितले.
आर्थिक निर्बंधामुळे गोंधळ व दबाव
सरकाने बँकेवर आर्थिक निर्बंध लागू केल्याने ग्राहकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. बँक बुडीतखात्यात जाऊन आपले पैसे बुडतील या भितीने पैसे काढण्यासाठी सर्व शाखांमध्ये खातेधारकांच्या रांगा लागत आहेत. शाखा व्यवस्थापक व कर्मचाऱयांवर पैशांसाठी दबाव वाढला आहे. संस्थेशी निगडीत 150 पिग्मी कलेक्टर अडचणीत आले असून 275 कर्मचारी दबावाखाली आहेत. संस्थेचे राज्यभरात 1 लाख 5 हजार भागधारक असून त्यांच्यात आपल्या गुंतवणुकीबद्दल असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ही बिकट परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने आर्थिक निर्बंध तात्काळ मागे घेण्याची मागणी सुर्या गावडे यांनी केली आहे. संस्थेकडून व्यवहारात ज्या तांत्रिक त्रुटी राहिल्या त्या दूर केल्या जातील असेही त्यांनी सांगितले.
संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम
एनपीए वाढल्याने संस्थेवर आर्थिक निर्बंध आले असले तरी संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. त्यामुळे संस्था बुडीतखात्यात जाण्याचा कुठलाच धोका नाही. संस्थेपाशी रु. 700 कोटींच्या ठेवी, रु. 530 कोटींचे कर्ज व एडवान्सीस तसेच रु. 290 कोटींच्या इतर बँकामध्ये ठेवी आहेत. याशिवाय साधारण रु. 150 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. त्यामुळे ग्राहकांचे पैसे बुडण्याचा कुठलाच धोका नाही. परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत ग्राहक व भागधारकांनी संयम बाळगावा असे आवाहनही व्हीपीकेच्या संचालक मंडळाने केले आहे.