ऑनलाईन टीम / बीजिंग :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच चीनच्या प्रसिद्ध टीकटॉक आणि व्ही-चॅटसह अन्य अॅपवर अमेरिकेत बंदी घालण्याची धमकी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर चीनने अमेरिकेला इशारा दिला आहे. अमेरिकेने जर व्ही-चॅटवर बंदी घातली तर चिनी नागरिकही अॅपल कंपनीवर बहिष्कार टाकतील, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी म्हटले आहे.
मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि चीनमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत चीनच्या धोकादायक अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. सप्टेंबरपासून अमेरिका चीनच्या टीकटॉक आणि व्ही-चॅट अॅपवर बंदी घालू शकते.
टीकटॉक आणि व्ही-चॅट हे दोन्ही ॲप देशाची राष्ट्रीय सुरक्षा, परदेश धोरण आणि अर्थव्यवस्थेला घातक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. ट्रम्प यांनी टिकटॉकला दणका देत टिकटॉकची मालकी असलेल्या बाईट डान्स या चिनी कंपनीला अमेरिकेतून गाशा गुंडाळण्यासाठी 90 दिवसांचा अवधी दिला होता.