वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूचा 14 वर्षीय बुद्धिबळपटू व्ही. प्रणवने सलग बुद्धिबळ स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय विजेतेपद मिळविले असल्याने त्याचा आता तामिळनाडूच्या निवडक बुद्धिबळपटूंच्या क्लबमध्ये समावेश झाला आहे. या निवडक बुद्धिबळपटूंच्या क्लबमध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर्स मॅन्युअल ऍरॉन, आर. रवि शेखर, के. मुर्गन यांचा समावेश आहे.
दोन दिवसापूर्वी व्ही. प्रणवने तामिळनाडू राज्यस्तरीय खुल्या फिडे मानांकन 2021 च्या बुद्धिबळ स्पर्धेतील विजेतेपद पटकाविताना आपले सर्वही म्हणजे 9 डाव जिंकले आहेत. 2019 साली व्ही. प्रणवने ही स्पर्धा जिंकताना 9 पैकी 8 गुण घेतले होते. 10 व्या इयत्तेमध्ये शिकणाऱया व्ही प्रणवने 2016 साली 10 वर्षांखालील वयोगटाच्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेत कास्यपदक तसेच 2015 साली 9 वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. कोरोना समस्येमुळे कानपूर येथे 13 ते 20 एप्रिल दरम्यान होणारी वरिष्ठाची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे.