प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याची तक्रार वारंवार केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना लवकरात लवकर लस मिळावी यासाठी विमानाने व्हॅक्सिन बेळगावमध्ये पाठविली जात आहे. यामुळे बेळगाव जिल्हय़ासह उत्तर कर्नाटकात व्हॅक्सिन काही तासांमध्ये पोहोचत आहे. मागील आठवडय़ाभरात तब्बल 356 किलो व्हॅक्सिन बेळगाव विमानतळावर दाखल झाली आहे. त्यामुळे कार्गो सेवेलाही नवे बळ मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भारतात तयार होणाऱया दोन व्हॅक्सिनपैकी एक व्हॅक्सिन पुणे येथे तयार होत आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिटय़ूटमध्ये कोव्हिशिल्ड ही व्हॅक्सिन तयार होते. यापूर्वी वाहनाने व्हॅक्सिन बेळगावला येत होती. परंतु यामध्ये वेळ व व्हॅक्सिनची वाहतूक कठीण होत असल्याने आता व्हॅक्सिन विमानाने पाठविली जात आहे. 12 जुलैपासून अलायन्स एअरने पुणे-बेळगाव-पुणे ही विमानफेरी पूर्ववत केली होती. याचा बेळगावमध्ये व्हॅक्सिन आणण्यासाठी उपयोग झाला. बेळगाव विमानतळावर आलेली व्हॅक्सिन आरोग्य विभागातर्फे इतर जिल्हय़ांत पाठविली जात आहे.
26 जुलै रोजी 11 बॉक्समधून 352 किलो व्हॅक्सिन बेळगावमध्ये आणण्यात आली. 28 जुलै रोजी 150 किलो तर 30 जुलैला 180 किलो व्हॅक्सिन अलायन्स एअरमधून दाखल झाली. बेळगावमध्ये ‘स्टेट व्हॅक्सिन स्टेशन सेंटर’ असल्याने येथून आजूबाजूच्या 7 जिल्हय़ांना व्हॅक्सिनचा पुरवठा केला जातो. उत्तर कर्नाटकातील केवळ बेळगावमधून पुण्याला विमानसेवा उपलब्ध असल्याने याचा फायदा बेळगावला होत आहे.