उच्च न्यायालयात व्हॅक्सिन डेपो बचाव समितीच्या कार्यकर्त्यांना दिलासा : पर्यावरणप्रेमींतून समाधान
प्रतिनिधी /बेळगाव
व्हॅक्सिन डेपोमधील झाडे तोडून त्या ठिकाणी विविध विकासकामे करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याला नागरिकांचा विरोध असताना देखील हे काम सुरुच होते. त्यामुळे व्हॅक्सिन डेपो बचाव समितीच्या 11 जणांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी होऊन तेथील कामकाज जैसे थे ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींना मोठा दिलासा मिळाला असून त्याचे स्वागत होत आहे.
व्हॅक्सिन डेपोमध्ये विविध औषधी वनस्पती तसेच इतर झाडे आहेत. त्यामुळे टिळकवाडी परिसराला वेगळे वैभव असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. व्हॅक्सिन डेपोमुळे बेळगावला ऑक्सिजन मोठय़ा प्रमाणात मिळतो. व्हॅक्सिन डेपोमधील झाडांना धक्का लागू नये, असे वारंवार स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांना सांगण्यात आले. तरी देखील ग्लास हाऊस व इतर विकासकामांच्या नावाखाली तेथील झाडांची कत्तल करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱयांसह इतर अधिकाऱयांना निवेदने देण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने पावले न उचलल्याने राजू टोपण्णावर आणि वरुण कारखानीस यांच्यासह 11 जणांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. डबल ग्रीन बेंचसमोर या याचिकेची सुनावणी झाली. उच्च न्यायालयाचे चिफ जस्टीस अभय श्रीनिवास ओक आणि न्यायाधीश सूरज गोविंदराज या स्पेशल पीआयएल ग्रीन बेंचसमोर सुनावणी झाली असता न्यायाधिशांनी व्हॅक्सिन डेपोचे कामकाज जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला आहे. जनहित याचिका दाखल केलेल्या कार्यकर्त्यांच्यावतीने ऍड. किरण कुलकर्णी आणि ऍड. सतीश बिरादार यांनी काम पाहिले. या निकालामुळे पर्यावरणप्रेमींतून समाधान व्यक्त करण्यात येत असून निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.