प्रतिनिधी / बेळगाव
व्हॅक्सिन डेपो मैदानात गुटखा, तंबाखू आणि सिगारेटची पाकिटे टाकल्याने हा परिसर समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. मैदानाच्या सभोवताली असणाऱया फुटपाथ आणि झाडांच्या बुंध्याखाली मद्यपान करून बाटल्या टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. अंधाराचा फायदा घेत या ठिकाणी अनेक गैरप्रकार वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे व्हॅक्सिन डेपोला समस्यांचे ग्रहण लागल्याचे दिसून येते.
वास्तविक पाहता व्हॅक्सिन डेपो मैदान स्वच्छ असले तरी मैदानाभोवती गुटखा, तंबाखूची पाकिटे टाकण्यात आली आहेत. येथील परिसरात पानशॉपची दुकाने असल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. त्यामुळे या ठिकाणी आलेल्या क्रीडापटूंना सराव करताना येथे टाकण्यात आलेल्या कचऱयातच सराव करावा लागत आहे. यामुळे लहान वयातच या मुलांवर विपरित परिणाम होऊ लागले आहेत. त्यामुळे ही समस्या अधिक गंभीर होण्यापूर्वी या ठिकाणी योग्य पावले उचलण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे.