कोविशील्ड कोव्हॅक्सिनच्या मिक्स डोजच्या अध्ययनास डीजीसीआयची मंजुरी ः तामिळनाडूत होणार 300 जणांवर परीक्षण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनच्या मिक्सिंगवर अध्ययनासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) मंजुरी दिली आहे. हे अध्ययन वेल्लोरच्या (तामिळनाडू) ख्रिस्तियन मेडिकल कॉलेजकडून केले जाणार आहे. सेंटल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (सीडीएससीओ) 29 जुलै रोजी या अध्ययनाची शिफारस केली होती. याचे परीक्षण 300 जणांवर केले जाणार आहे. एका व्यक्तीला विविध लसींचे डोस देण्याचा कोणता प्रभाव पडतो हे जाणून घेण्याचा यामागे उद्देश आहे.
व्हॅक्सिन मिक्सिंगवर आयसीएमआरकडून करण्यात आलेल्या अध्ययनाच्या व्यतिरिक्त हे अध्यन असणार आहे. आयसीएमआरने व्हॅक्सिन मिक्सिंगवर मे-जूनदरम्यान उत्तरप्रदेशात अध्ययन केले होते. डीजीसीआयच्या तज्ञ समितीने कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनच्या मिक्स डोसच्या अध्ययनाची सूचना केली होती.
अधिक अँटीबॉडीजची निर्मिती
आयसीएमआरने व्हॅक्सिन मिक्सिंगचे अध्ययन 3 गटांमध्ये विभागले होते. प्रत्येक गटात 40 जणांना सामील करण्यात आले होते. लस दिल्यावर सर्व गटांमधील लोकांची सुरक्षा आणि इम्युनिटी प्रोफाइलची तुलना करण्यात आली. कोव्हॅक्सिन आणि कोविशील्डचा मिक्स डोस घेणाऱया लोकांमध्ये कोरोनाच्या अल्फा, बीटा आणि डेल्टा व्हेरियंट्सच्या विरोधात अधिक इम्युनिटी आढळली. एकाच लसीचे दोन डोस घेणाऱयांच्या तुलनेत दोन लसींचे मिक्स डोस घेतलेल्या लोकांमध्ये अधिक अँटीबॉडी होत्या असे अध्ययनात दिसून आले आहे.
व्हॅक्सिन मिक्सिंग सुरक्षित
आयसीएमआरचे अध्ययन एडिनोव्हायरस वेक्टर प्लॅटफॉर्म व्हॅक्सिन आणि इनऍक्टिवेटेड होल व्हायरस व्हॅक्सिनचे कॉम्बिनेशनचे पहिले अध्ययन होते. दोन्ही प्रकारच्या लसींचा मिक्स डोस घेणे सुरक्षित असल्याचे अध्ययनातून समोर आले आहे. अध्ययनात सामील लोकांना न सांगता दुसऱया लसीचा दुसरा डोस देण्यात आला. लोकांमध्ये लसीच्या दुसऱया डोसवरून भीती निर्माण होत नये म्हणून असे करण्यात आल्याचे आयसीएमआरच्या एपिडेमियोलॉजी अँड कम्युनिकेबल डिसिजेच्या प्रमुख डॉ. सिमरन पांडा यांनी म्हटले आहे.
3 गटांवर अध्ययन
व्हॅक्सिन मिक्सिंगचे निष्कर्ष तपासण्यासाठी स्वयंसेवकांना प्रत्येकी 40 जणांच्या तीन गटांमध्ये विभागण्यात आले होते. मिक्स डोसयुक्त गटात 18 लोक होते. यात 11 पुरुष आणि 7 महिला होत्या, त्यांचे सरासरी वय 62 वर्षे हेते. पण यातील 2 जण पुढील काळात परीक्षणातून बाहेर पडले. तर एकाच लसीच्या दोन्ही डोसयुकत गटात सामील 40 लोकांपैकी एका व्यक्तीमध्ये उच्च रक्तदाब दिसून आला. या अध्ययनाच्या निष्कर्षांनी तज्ञ संतुष्ट आहेत, पण अधिक विस्तृत संशोधनाची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.