‘पीएसएलव्ही-सी-52’ आज झेपावणार : अन्य दोन छोटे उपग्रहही समाविष्ट
श्रीहरिकोटा / वृत्तसंस्था
चालू वर्षातील अवकाश मोहिमेतील इस्रोचा श्रीगणेशा व्हलेंटाईन डेच्या दिवशी सुरु होत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) या वषीच्या आपल्या पहिल्या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी उलटी गिनती रविवारी पहाटेपासून सुरू केली. त्यानुसार आंध्रप्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 5ः59 वाजता उपग्रह प्रक्षेपित होतील. 1,710 किलो वजनाचा ईओएस-04 उपग्रह पीएसएलव्ही-सी-52 द्वारे पृथ्वीपासून 529 किमी उंचीवर सूर्याच्या ध्रुवीय कक्षेत सोडण्यात येईल.
पीएसएलव्ही-सी-52 हे रॉकेट श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्चपॅडवर सज्ज करण्यात आले आहे. या सॅटेलाईटच्या प्रक्षेपणाची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी 25 तास 30 मिनिटे अगोदर काउंटडाऊन सुरू करण्यात आले. इस्रोने स्वतः ट्विटरवर या सॅटेलाईट प्रक्षेपणाची माहिती दिली आहे. देशात आलेल्या कोरोना महामारीमुळे उपग्रहाच्या प्रक्षेपणाच्या तारखा सतत पुढे ढकलण्यात येत होत्या. मात्र आता इस्रोने त्याच्या प्रक्षेपणाची तारीख निश्चित केली आहे.
‘ईओएस-04’ हा रडार इमेजिंग सॅटेलाईट
ईओएस-04 सॅटेलाईट हा प्रत्यक्षात मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट असून तो मुख्यत्वेकरून पाळत ठेवण्यासाठी वापरला जातो. याचा वापर कोणत्याही हवामानात पृथ्वीची उच्च दर्जाची छायाचित्रे घेण्यासाठी केला जाईल. याद्वारे शेती, वनीकरण, वृक्षारोपण, जमिनीतील ओलावा, पाण्याची उपलब्धता आणि पूरप्रवण क्षेत्राचे नकाशे तयार करण्यात मदत होणार आहे.
दोन लघु उपग्रह
मोहिमेची सर्व तयारी पूर्ण झाली असून मुख्य सॅटेलाईटसोबत आणखी दोन लघु उपग्रहही अवकाशात पाठवले जाणार आहे. यातील पहिल्या सॅटेलाईटचे नाव ‘इन्स्पायर सॅट-1’ असे असून तो इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी बनवला आहे. याच्या निर्मितीसाठी अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापीठाच्या ऍटमॉस्फियर अँड स्पेस फिजिक्सच्या प्रयोगशाळेची मदत घेण्यात आली आहे. तर दुसऱया उपग्रहाचे नाव आयएनएस-2टीडी असे असून तो भारत-भूतानचा संयुक्त सॅटेलाईट आहे. हा एक बोल्डर आणि तांत्रिक प्रात्यक्षिक उपग्रह आहे.