वृत्तसंस्था/ बर्लीन
आंतरराष्ट्रीय टेनिसपटू ऍलेक्झांडर व्हेरेव्हने 2021 सालातील जर्मनीचा सर्वोत्तम क्रीडापटूचा पुरस्कार पटकाविला आहे. एटीपी फायनल्स स्पर्धेत व्हेरेव्हने एटीपी मानांकनात पहिल्या दोन क्रमांकावरील टेनिसपटूंना हरविण्याचा पराक्रम केला. 2021 च्या टेनिस हंगामात व्हेरेव्हने 59 सामने जिंकले असून 15 सामने गमविले. त्याचप्रमाणे टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत व्हेरेव्हने एकेरीचे सुवर्णपदक आणि एटीपी फायनल्स स्पर्धेत विजेतेपद मिळविले.
या दर्जेदार कामगिरीमुळे 2021 सालातील सर्वोत्तम क्रीडापटूंसाठी अलेक्झांडर व्हेरेव्हची निवड करण्यात आली. 24 वर्षीय व्हेरेव्हने एटीपी फायनल्स स्पर्धेत सर्बियाच्या टॉप सीडेड जोकोविचला पराभूत केले. त्यानंतर त्याने रशियाच्या द्वितीय मानांकित मेदव्हेदेवला पराभवाचा धक्का देत जेतेपद मिळविले. 2021 च्या एटीपी टूर हंगामात व्हेरेव्हने सहा स्पर्धा जिंकल्या आहेत.