कंपनी अन् सरकारच्या भागीदारीतून सुविधा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नव्या कोरोनाबाधितांची संख्या देशात सद्यकाळात कमी होत आहे. तर कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी देशात व्यापक स्तरावर लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत कोविन पोर्टलद्वारेच लस घेण्याचा स्लॉट किंवा अपॉईंटमेट बुक करता येत होती. यात अनेकदा स्लॉट रिकामी असण्याची प्रतीक्षा करावी लागत होती. पण आता सरकारने स्लॉट बुकिंगची प्रक्रिया अधिकच सोपी केली आहे. लोकांना आता व्हॉट्सऍपवरूनही लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येणार आहे.
व्हॉट्सऍपची मालकी असलेली कंपनी फेसबुकने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासोबत मिळून लोकांना लसीकरणाच्या स्लॉटच्या बुकिंगसाठी ही सुविधा सुरू केली आहे. याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनीच ट्विटरवर दिली आहे. नागरिक सुविधेसाठी एका नव्या पर्वाचा मार्ग प्रशस्त करत आता काही मिनिटांमध्ये स्वतःच्या फोनवर सहजपणे कोविड-19 लसीचा स्लॉट बुक करता येईल असे त्यांनी म्हटले आहे.
भारत सरकार आणि आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाशी आम्ही भागीदारी करत आहोत. लसीकरणाचा स्लॉट बुक करण्यासोबतच लोक या प्लॅटफॉर्मद्वारे स्वतःचे लसीकरणाचे प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकतील. 30 लाख भारतीयांनी या सुविधेचा लाभ घेतला असल्याची माहिती व्हॉट्सऍपचे सीईओ विल कॅथकार्ट यांनी दिली आहे.
स्लॉट बुकिंगची प्रक्रिया
1 सर्वप्रथम मोबाईलवर मायजीओव्ही कोरोना हेल्पडेस्कचा क्रमांक 9013151515 सेव्ह करून घ्या.
2 त्यानंतर सेव्ह करण्यात आलेल्या या क्रमांकावर व्हॉट्सऍपवरून इंग्रजीत बुक स्लॉट लिहून संदेश पाठवा.
3 त्यानंतर एसएमएसद्वारे प्राप्त 6 अंकांचा ओटीपी त्यावर नमूद करा.
4 व्हॉट्सऍप चॅटदरम्यान स्वतःच्या सुविधेनुसार लसीकरणाची तारीख, ठिकाण, पिनकोड आणि लसीचा प्रकार निवडा.
5 त्यानंतर स्वतःच्या स्लॉटला या चॅटदरम्यान पडताळून पहा आणि निश्चित तारखेला केंद्रावर जाऊन लस घ्या.