नव्या पदाच्या कार्याचा आरंभ, पहिल्याच दिवशी घेतली बैठक
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक सरकारचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी म्हणून मंगळवारी सायंकाळी 5 वाजता भाजप नेते शंकरगौडा पाटील यांनी सुत्रे स्वीकारली. नव्या पदाचा कार्यारंभ करताना दिल्लीच्या कर्नाटक भवनात त्यांनी अधिकारी वर्गाची बैठक घेतली. कर्नाटकाच्या विकासासंदर्भात केंद्रातून आवश्यक मदती संदर्भात त्यांनी चर्चा केली.
कर्नाटक सरकार विकसित होण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कर्नाटक सरकारच्या प्रलंबित प्रकल्पांसाठी केंद्रिय अधिकाऱयांशी योग्य समन्वय राखण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱयांना केल्या. यावेळी विजय रंजनसिंग, कर्नाटक भवनाचे विशेष निवासी आयुक्त प्रसन्न आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
शंकरगौडा पाटील यांची नुकतीच दिल्ली येथे या नव्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाची सुत्रे स्वीकारण्यापूर्वी दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पार्थीवावर कर्नाटक सरकारच्यावतीने पुष्पअर्पण करुन आदरांजली वाहिली आहे.