कुडाळमधील घटनेने खळबळ : पहाटेची घटना : गणेशोत्सवात नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न?
प्रतिनिधी / कुडाळ:
कुडाळ बाजारपेठेतील मारुती मंदिरनजीकच्या भाजी मार्केटमध्ये मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन पिशव्यांमध्ये 100 रु. च्या 5 लाख 25 हजार रु. किमतीच्या बनावट नोटा सापडल्या. दोन पिशव्यांमध्ये मिळून एकूण 5,250 नोटा होत्या. दोन पिशव्यांमध्ये 53 बंडले सापडली. यामुळे कुडाळ शहरात खळबळ उडाली आहे.
ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर या बनावट नोटा सापडल्याने गणेशोत्सव काळात या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कुडाळ पोलिसांनी या नोटा जप्त करून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, बनावट नोटा ठिकठिकाणी वितरीत करण्याचे मोठे रॅकेट जिल्हय़ात कार्यरत असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या नोटा भाजीचा व्यवसाय व वाहनातून चलनात आणण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
याबाबत पोलीस हवालदार संजय कदम यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आपण गुडमॉर्निंग डय़ुटीला असताना इम्तिहाज सादिक बागवान (रा. पानबाजार-कुडाळ) व अनिल उर्फ बंडय़ा सावंत यांनी दूरध्वनीवरून भाजी मार्केट येथे दोन पिशव्यांमध्ये नोटा सापडल्याचे सांगितले. आपण तातडीने तिथे जाऊन खात्री केली असता, नोटा सापडल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न अज्ञाताने केल्याप्रकरणी त्यांनी तक्रार दिल्यावरून कुडाळ पोलीस ठाण्यात भादंवि कलम 489 अ-ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहाटे नोटांनी भरलेल्या पिशव्या दिसल्या
कुडाळ-भाजी मार्केटच्या ठिकाणी संकेश्वर, बेळगाव, कोल्हापूर येथून भाजी घेऊन येणारे टेम्पो-ट्रक येतात. या वाहनांतून आपली आलेली भाजी ताब्यात घेण्यासाठी भाजी मार्केटच्या जवळच राहणारे इम्तिहाज सादिक बागवान हे भाजी व्यावसायिक मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भाजी मार्केटकडे आले. मात्र, नेहमी सुरू असणाऱया भाजी मार्केटमधील विजेचे दिवे सुरू नव्हते. मार्केटमध्ये आल्यानंतर त्यांनी ते सुरू केले आणि तिथेच मध्ये ठेवण्यात आलेल्या दोन पिशव्या त्यांच्या दृष्टीस पडल्या. एक प्लास्टिकची पिशवी होती. ती पारदर्शक असल्याने आतील नोटांची बंडले दिसत होती, तर दुसरी पिशवी कापडी होती. नोटांची बंडले पाहून ते अवाकच झाले. ते व त्यांच्या पत्नीशिवाय अन्य कुणी नव्हते. त्यांनी पत्नीला तिथेच थांबायला सांगून पोलीस ठाण्याचा नंबर मिळतो का, हे पाहण्यासाठी गांधी चौकाच्या दिशेने गेले. त्याचवेळी तिथून वृत्तपत्रे टाकायला जाणारे मिलिंद देसाई यांना त्यांनी पोलीस ठाण्याचा नंबर विचारला. देसाई यांनी त्यांना तुम्ही त्या पिशवीकडे जाऊन थांबा, असे सांगितले. नंतर देसाई यांनी बंडय़ा सावंत यांना दूरध्वनी करून माहिती देत पोलीस ठाण्यात कळविण्यास सांगितले.
पोलिसांना माहिती दिली
सावंत यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे रुपेश सारंग व एस. बी. कदम यांना कल्पना दिली व भाजी मार्केटमध्ये पोहोचले. सारंग, कदम तसेच बुटेलो हे पोलीस कर्मचारी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास तेथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना कल्पना दिल्यानंतर तेही तेथे पोहोचले.
सर्वत्र सतर्कतेच्या सूचना
दोन पिशव्यांमध्ये नोटांची बंडले सापडल्याने कोणी चोरटय़ाने एटीएम किंवा बँक किंवा कुठे चोरी करून हे पैसे ठेवले असावेत, या शक्यतेने पोलिसांनी तात्काळ सतर्कतेच्या सूचना आपल्या कर्मचाऱयांना दिल्या. शहर व परिसरातील एटीएम सेवा केंद्राला भेट देऊन पाहणी करण्यात आली. मात्र, तसे कुठे घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली नाही.
नोटा बनावट असल्याचे उघड
त्यानंतर पोलिसांनी स्पॉट पंचनामा करून नोटांच्या पिशव्या उघडल्या. त्या मोजत असताना हाताला जाड लागू लागल्या. त्यामुळे त्या बनावट असल्याचे जाणवत होते. त्यानंतर बँक अधिकाऱयांशी संपर्क साधून मशीनद्वारे नेटांची खात्री केली असता, त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चोरी झाली नसल्याची पोलिसांची खात्री झाली.
बनावट नोटांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता
या बनावट नोटांमुळे बनावट नेटांचे मोठे रॅकेट सिंधुदुर्गात कार्यरत असण्याची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. या नोटा भाजी मार्केटमध्ये कशा आल्या? कोणी आणल्या? यामागील सूत्रधार कोण?, याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान कुडाळ पोलीस ठाण्याचा कार्यभार नव्याने स्वीकारलेले निरीक्षक फुलचंद मेंगडे व सहकाऱयांसमोर आहे. कुडाळमध्ये पाच लाख रु. बनावट सापडल्याने जिल्हय़ाच्या अन्य भागातही अशाचप्रकारे नोटांचे वितरण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजीतून नोटा आल्याचा संशय
कुडाळ बाजारपेठेत संकेश्वर, कोल्हापूर, बेळगाव भागातून मोठय़ा प्रमाणावर भाजी आणली जाते. यात स्थानिक व बाहेरचे व्यापारीही भाजी व्यवसाय करतात. एखाद्या भाजी व्यावसायिकाच्या माध्यमातूनच या बनावट नोटा गणेश चतुर्थी काळात बाजारात चलनात आणण्यासाठी आल्या असाव्यात, असा संशय पोलिसांना आहे. तसेच बनावट नोटा प्रकरणात काहींचा सहभाग यापूर्वी उजेडात आला होता. त्यांच्याकडे संशयाने पाहिले जात आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासणार
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी भाजी मार्केट परिसर तसेच आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे. सोमवारी रात्री कोण-कोण भाजी मार्केट परिसरात आले, कोणत्या वाहनांचा वावर होता, या सर्व गोष्टींची चौकशी करण्यात येईल. संशयितांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार, असे मेंगडे यांनी सांगितले. आमचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे, असेही ते म्हणाले. या प्रकरणाचा तपास मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ढोबळे करीत आहेत.
विजेचे दिवे कुणी बंद केले?
रोज रात्री भाजी मार्केटमधील विजेचे दिवे सुरू केले जातात. सोमवारीही ते सुरू केले होते. मात्र, बागवान पहाटे तेथे आले, तेव्हा ते बंद होते. मग हे दिवे रात्री उशिरा कोणी बंद केले? या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर बनावट नोटा आणून त्या वितरीत करण्यात आल्या नाहीत ना?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अशी होती नोटांची बंडले 100 रु. च्या 5,250 नोटा म्हणजे 5 लाख 25 हजार रु. च्या बनावट नोटा सापडल्या. 100 रु. ची 52 बंडले व 53 वे बंडल अर्धे म्हणजे 100 रु. च्या पन्नास नोटांचे सापडले.