नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गूगल इंडियाने आपल्या प्ले स्टोअरवरून अनेक ऍप्स हटवले आहेत. वापरकर्त्यांच्या संरक्षणात्मक धोरणाचे उल्लंघन करून ऑनलाईन कर्ज पुरवठा करणाऱया ऍप्सना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. जवळपास 100 हून जास्त पर्सनल लोन ऍप्सवर गुगलने धडक कारवाई केली आहे. सरकार आणि युजर्सकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर गुगलने ही कारवाई केली आहे.
अनेक युजर्स गेल्या काही दिवसांपासून शॉर्ट टर्म लोन देणाऱया कंपन्यांविरोधात तक्रार करीत होते. आपल्या लोनसाठी अनेक कंपन्या युजर्सचा छळ करीत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. काहींनी तर लोन फेडू न शकल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला होता. तर काही कंपन्या पर्सनल लोन देण्याच्या नावाखाली कॉन्टॅक्ट डिटेल्स ऍक्सेस करीत होती. काहींना तर वसुली एजंटकडून धमकावले जात असल्याच्या तक्रारी सुद्धा केल्या होत्या. त्यानंतर गुगल इंडियाने कडक पाऊल उचलत अनेक ऍप्स हटविली आहेत.