वार्ताहर / कुडाळ:
चिपळूण येथे उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे नागरिकांच्या घरांमधील लाईट फिटिंगमध्ये पाणी जाऊन वीजपुरवठा बंद आहे. नुकसान झालेल्या घरांमधील लाईटची दुरुस्ती करून देण्यासाठी कुडाळ व मालवण तालुक्मयातील शिवसेना सरपंच संघटना व आमदार वैभव नाईक यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून शंभर इलेक्ट्रिशियनची टीम चिपळूण येथे पाठविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
6 व 7 ऑगस्ट रोजी हे मदतकार्य केले जाणार आहे. यात जास्तीत जास्त लोकांच्या घरांमध्ये लाईट दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यासाठी मोठय़ा प्रमाणात वीज फिटिंगसाठी आवश्यक असणारे साहित्य लागणार आहे. दानशूर व्यक्तींना पूरग्रस्तांना फिटिंगसाठी आवश्यक असलेले साहित्य वायर, बल्ब, केसिंग पट्टी, होल्डर, स्विच, ट्रीपर आदींची मदत करायची असल्यास कुडाळ व मालवण शिवसेना शाखेमध्ये जमा करावी. तसेच लाईट फिटिंगच्या मदतकार्यासाठी जिल्हय़ातील जे इलेक्ट्रिशियन चिपळूण येथे जाण्यास इच्छुक असतील, त्यांनीही कुडाळ सरपंच संघटना अध्यक्ष सचिन कदम – 9421990399 किंवा मालवण सरपंच संघटना अध्यक्ष नंदू गावडे – 9420210013 यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन कुडाळ व मालवण शिवसेना सरपंच संघटनेने केले आहे.