गावागावात रक्तदान चळवळ वाढविण्यासाठी प्रयत्न : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा पुढाकार : दुर्मिळ रक्तगट दात्यांचा संग्रह निर्माण
प्रतिनिधी / मालवण:
रक्तदान, देहदान, अवयवदान व रुग्णमित्र या संकल्पना घेऊन जिल्हय़ातील सर्वात मोठी कार्यकारिणी असलेली व एकमेव नोंदणीकृत संस्था असलेल्या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने मित्रसंस्थांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 100 रक्तदान शिबिरे आयोजित केली. यातून सुमारे 2500 पेक्षा अधिक ब्लड बॅग्ज गोळा केल्या. कोविड काळात रक्ताचा तुटवडा पडू न देण्यासाठी अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे लसीकरण होण्याअगोदर आयोजित केली आणि त्यात मार्गदर्शन करून अनेक तरुणांना रक्तदाते बनविले. कोविड रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्लेटलेटस डोनर निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
रक्तदान चळवळ गतिमान करण्यासाठी जिल्हय़ातील काहींनी पुढाकार घेऊन निर्माण केलेल्या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने काही महिन्यातच जिल्हय़ात नवनवीन रक्तदाते निर्माण करत कोविड काळातही रक्तदान चळवळ पुढे नेली आहे. कोविड काळातच निर्माण झालेल्या या प्रतिष्ठानने एकही रुपयाची आर्थिक मदत न घेता पदरमोड करत आपल्या उपक्रमांना चालना दिली आहे. सिंधुदुर्गनगरी येथे संस्थेचे कार्यालयही एका दानशूर व्यक्तीने स्वखर्चातून उपलब्ध करून दिले आहे.
स्वखर्चातून उपक्रम अन् सामाजिक आनंद
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे जिल्हय़ातील प्रत्येक तालुक्यात एक शाखा सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी त्या-त्या तालुक्यातील रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. यातून नवीन रक्तदात्यांचा सन्मान केला जातो. दुर्मिळ रक्तदात्यांचा शोध घेऊन त्यांचाही सत्कार केला जातो. हा उपक्रम आतापर्यंत प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी स्वखर्चातून करत आहेत. जिल्हय़ात सतत वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांना रक्ताची निकड भासल्यास अगर प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यासाठीही प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व पदाधिकारी स्वखर्चातूनच प्रवास करत जिल्हा वा खासगी रुग्णालयात जात आहेत. सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचा आनंद मिळतो, असे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱयांनी स्पष्ट केले.
अनेक गावात पहिल्यांदाच झाले रक्तदान
दोन ते तीन वर्षांत अनेक ठिकाणी 100 पेक्षा अधिक व्याख्याने, कर्मशाळा, मार्गदर्शन शिबिरे घेतली. त्यातून अनेक रक्तदाते मिळविले. त्यांना रक्तदान करायला प्रवृत्त केले. ज्या गावात एकदाही रक्तदान शिबीर झाले नाही, अशा अनेक गावात रक्तदान शिबिरे घेत रक्तदान चळवळीत गावांना सहभागी केले. जिल्हय़ातल्या तिन्ही रक्तपेढय़ांना पुरेसा रक्तपुरवठा केला. जिल्हय़ाबाहेर उर्वरित महाराष्ट्रासाठी रक्तदान शिबिरे घेतली. कोल्हापूरसाठी सहा शिबिरे घेतली. रक्तपेढय़ांच्या अडचणी सोडविण्यासाठीही सहकार्य केले. यात रक्तपेढीला कॉट्स उपलब्ध करून देणे, टेलिफोन सुरू करून देणे आदी सहकार्य करण्यात येईल.
दुर्मिळ रक्तगटांच्या दात्यांचा संग्रह
दुर्मिळ रक्तगटांच्या दात्यांचा स्वतंत्र संग्रह निर्माण केला. दहा लाखात 4 असे प्रमाण असणाऱया अत्यंत दुर्मिळ अशा बॉम्बे ब्लड ग्रुप या रक्तगटाचे सिंधुदुर्गात एकूण 13 रक्तदाते शोधून संग्रही ठेवले. जिल्हा कार्यालयाची स्थापना केली. देहदान, अवयवदानाबाबत जनजागृती करत अनेकांना प्रवृत्त केले. आतापर्यंत 30 व्यक्तींनी याबाबत तयारी दर्शविली आहे. रुग्णमित्र म्हणून अनेक रुग्णांना विविधप्रकारे मदत केली. रक्तदात्यांना गाडी मिळवून देणे, गंभीर रुग्णाबरोबर थांबणे, औषधे उपलब्ध करून देणे, आर्थिक सहाय्य देणे, रुग्णवाहिकेची सोय करून देणे, गोवा, बेळगाव तसेच जिल्हय़ासह अन्य जिल्हय़ातही प्रतिष्ठानतर्फे काम उभे करण्यात आले आहे.
नऊ थॅलेसेमियाच्या मुलांना घेतले दत्तक
इतर आजारांच्या रुग्णांना आवश्यकतेनुसार प्लेटलेटस उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिष्ठानतर्फे सहकार्य करण्यात आले. जिल्हय़ातील नऊ थॅलेसेमियाच्या मुलांचा रक्त चढविण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी त्यांचे थेट पालकत्व घेतले आहे. यासाठी एसएसपीएम कॉलेज व लाईफटाईम हॉस्पिटलच्या माध्यमातून सहकार्य मिळते. कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयात या मुलांना नियमितपणे रक्त बदलण्याच्या प्रक्रियेसाठी येणाऱया अडचणींबाबतही प्रतिष्ठानने पाठपुरावा करून सहकार्य केले आहे.