वृत्तसंस्था/ ढाका
विंडीजविरूद्ध होणाऱया आगामी कसोटी आणि वनडे मालिकांसाठी बांगलादेशच्या क्रिकेट मंडळाने सोमवारी प्राथमिक संघाची घोषणा केली असून अनुभवी अष्टपैलू शकीब अल हसनचा या संघात समावेश केला आहे.
बांगलादेशच्या निवड समितीने 22 खेळाडूंची यादी घोषित केली आहे. अनुभवी अष्टपैलू शकीब अल हसनवर मँच फिक्सिंगच्या प्रकरणात दोषी ठरल्याने दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. आयपीएल स्पर्धेवेळी एका भारतीय बुकीबरोबर शकीब अल हसनने संपर्क साधला होता. शकीब अल हसनच्या बंदीचा कालावधी गेल्या वर्षीच्या 29 ऑक्टोबरला समाप्त झाला. दरम्यान बंदीपूर्वी शकीब अल हसनने बांगलादेशच्या कसोटी आणि टी-20 संघाचे नेतृत्व केले होते. वनडे क्रिकेटमध्ये बांगलादेशतर्फे मुर्तझा सर्वाधिक बळी मिळविणारा पहिला गोलंदाज असून त्याला मात्र या आगामी मालिकासाठी वगळण्यात आले आहे.
पुढील आठवडय़ापासून बांगलादेशच्या निवडक क्रिकेटपटूंच्या सराव शिबिराला प्रारंभ होणार आहे. 14 आणि 16 जानेवारीला दोन सरावाचे सामने आयोजित केले आहेत. विंडीजच्या बांगलादेश दौऱयाला प्रारंभ झाल्यानंतर उभय संघातील पहिला वनडे सामना ढाका येथे 20 जानेवारीला होणार आहे. तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेतील दुसरा सामना 22 जानेवारीला ढाका येथे तर तिसरा सामना चित्तगाँग येथे 25 जानेवारीला खेळविले जाणार आहेत. यानंतर उभय संघामधील पहिली कसोटी 3 ते 7 फेब्रुवारी दरम्यान चित्तगाँग आणि 11 ते 15 फेब्रुवारीला दुसरी कसोटी ढाका येथे होणार आहे.
बांगलादेश प्राथमिक संघ – तमीम इक्बाल (कर्णधार), मोमीनूल हक, तस्किन अहमद, खलीद अहमद, शकीब अल हसन, हसन मेहमूद, नझिमुल हुसेन, मुष्फीकर रेहमान, मुष्कीकर रहीम, मेहदी हसन मिराज, मोहम्मद मिथुन, टी. इस्लाम, लिटॉन दास, नुरूल हसन, यासीर अली, एस. इस्लाम, सैफ हसन, नईम हसन, अबु जायेद आणि इ. हुसेन.