ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या कार्यकाळाला तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2021 रोजी संपत होता, पण मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने दास यांची पुढील तीन वर्षांसाठी आरबीआयच्या गव्हर्नरपदी पुन्हा नियुक्ती करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. 10 डिसेंबर रोजी त्यांची 26 वे गर्व्हर्नर म्हणून पुन्हा नियुक्ती होईल.
दास यांनी 10 डिसेंबर 2018 रोजी आरबीआय गव्हर्नरपदाची सूत्रे स्वीकारली. ते आरबीआयचे 25 वे गव्हर्नर बनले. शक्तिकांत दास हे माजी वित्त सचिव आणि वित्त आयोगाचे सदस्यही राहिले आहेत. उर्जित पटेल यांची सप्टेंबर 2016 मध्ये आरबीआयच्या 24 व्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली होती, परंतु त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच वैयक्तिक कारणे सांगून त्यांनी अचानक आरबीआयच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या जागी दास यांची नियुक्ती करण्यात आली होती.
शक्तिकांत दास हे यांनी इतिहास एम.ए. केले असून, ते तामिळनाडू केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आर्थिक व्यवहार विभागात सहसचिव अर्थसंकल्प, तामिळनाडू सरकारच्या महसूल विभागात आयुक्त आणि विशेष आयुक्त, तामिळनाडूच्या उद्योग विभागात सचिव आणि इतर विविध पदांवर काम केले आहे.