लेस कयेस / वृत्तसंस्था
अमेरिकेजवळील अटलांटिक महासागरातील हैती देशात शक्तिशाली भूकंप झाला असून या दुर्घटनेत 1 हजार 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 हजार 700 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे मोठय़ा प्रमाणात जीवित तसेच वित्तहानी झाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भूकंपामुळे अनेक इमारतींची पडझड झाली आहे. संपूर्ण शहर उद्ध्वस्त झालं आहे. तसेच अनेकजण अद्यापही इमारतींच्या ढिगाऱयाखाली अडकले आहेत. शनिवारी भूकंपामुळे हैतीमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. भूकंपामुळे उद्भवलेल्या भूस्खलनामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. अमेरिकेसह अर्जेंटिना, चिली या देशांनीही मदतीची घोषणा केली आहे. दरम्यान, कोरोना संकट, राष्ट्रपतींची हत्या, अफाट गरिबी आणि भूकंप या लागोपाठच्या संकटांमुळे हैतीमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखो नागरिक बेघर झाले आहेत. हैतीच्या सरकारने संपूर्ण देशात एक महिन्यासाठी आरोग्यसेवेचा आपत्काळ जाहीर केला आहे.