अक्रूर व कृतवर्मा हे शतधन्वाला पुढे म्हणाले-हे महापराक्रमी शतधन्वा! तू हे जाणतोस की सत्राजिताची गुणवान, रूपसंपन्न, चतुर कन्या आपली पत्नी व्हावी म्हणून आपण तिघांनीही तिला लग्नाची मागणी घातली होती. पण सत्राजिताने आमची विनंती धुडकावून लावून तिचा कृष्णाशी विवाह लावून दिला. आता लोक आम्हाला हसतात. लोक चर्चा करतात की या तिघांमध्ये काही दोष असल्यानेच सत्राजिताने त्यांना आपले कन्यारत्न दिले नसावे. हा सरळ सरळ आमच्यावर अन्याय आहे आणि सत्राजिताने तो केला आहे. या अपराधाची सजा सत्राजिताला द्यायलाच हवी. तू म्हणशील की स्यमंतकमणी सत्राजिताच्या ताब्यात आहे आणि सत्राजित जिवंत असताना काय आणि कसे काही करावे? सत्राजिताने स्यमंतकमणी राजाकडे न देता आपला भाऊ प्रसेन याच्याकडे दिला होता आणि प्रसेनाला मारून सिंहाने तो हरण केला हे तू जाणतोस. त्याच मार्गाने तू सत्राजिताचा काटा काढ.
अक्रूरकृतवर्म्याचिया युक्ती । शतधन्वयाची भेदली मति । उभयबोधें तो दुर्मति । अधम निघाईं प्रवर्तला । सत्राजिताच्या रिघोनि सदनीं । निद्रित असतां शय्याभुवनीं । स्यमंतकाच्या लोभेंकरूनी । त्यातें वधूनि मणि हरला । निद्रितवधाऐसें पाप । मनीं न धरूनि तद्भय अल्प । मणिलोभास्तव दस्युकल्प। केला साक्षेप दुष्टत्वें । शतधन्वासि समीप मरण । म्हणोनि रुचलें हें आचरण । अक्रूरकृतवर्म्यांचें वचन । जालें कारण तत्कर्मा । कैसा मारिला सत्राजित । राया ऐकें तेही मात । बलात्कारें दस्युवत। रात्रीं सदनांत रिघाला ।
अक्रूर व कृतवर्म्याने जी युक्ती सांगितली ती ऐकून शतधन्वाचा बुद्धीभेद झाला. तो विवेकाचा मार्ग सोडून विपरीत मार्गावर चालू लागला. जो आपल्याला दुर्मार्गाचा सल्ला देतो तो मित्र मानावा काय? पण लोभाने त्याला आंधळा केला, मतिभ्रष्ट केला. सत्राजित रात्री झोपला असता शतधन्वा त्याच्या घरात हळूच शिरला. त्याच्या शयनगृहात शिरून त्याने निद्रीस्त असलेल्या सत्राजिताचा वध केला आणि स्यमंतकमणी चोरून नेला. निद्रीतवधाचे भयंकर पाप आपण करत आहोत हा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही. स्यमंतकमण्याच्या लोभाने दुष्टाने हा दरोडा घातला. शतधन्वाचे मरण जवळ आले होते म्हणून अक्रूर व कृतवर्म्याचा दुष्ट सल्ला त्याला पसंत पडला आणि त्याच्या हातून हे भयंकर पापकर्म घडले. बलात्काराने रात्री घरात शिरून शतधन्वाने सत्राजिताला कसा मारला हे राजा आता ऐक, असे महामुनी शुकदेव परिक्षितीला सांगतात.
निद्रित असतां शय्यागारिं । हिंसक जैसा पशूतें मारी । तैसाचि कंठ छेदितां करिं । भोंवत्या नारी आक्रन्दती । बळें घालूनि दरवडा । निद्रितातें मारूनि होडां । भोंवता नारिंचा हंबाडा । मणि रोकडा हरितिला । अनाथापरी रडती नारी । येरें मनि बांधोनि पदरिं । निघोनि जाय दरोडेकरी । जाता जाला तो तैसा। स्त्रिया बाळकें करिती रुदन । दासदासीकिंकरजन । सत्यभामा आक्रन्दोन । आली धांवोन जनकापें ।
Ad. देवदत्त परुळेकर