विंडीजविरुद्ध पहिली कसोटी पहिला दिवस
वृत्तसंस्था/ छत्तोग्राम
पहिल्या दोन सत्रात चार बळी गमविल्यानंतरही बांगलादेशने विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी बऱयापैकी वर्चस्व ठेवले. सलामीवीर शदमन इस्लामने अर्धशतक नोंदवले तर मुश्फिकुर रहीम, शकीब अल हसन व लिटन दास यांनी उपयुक्त योगदान दिल्याने दिवसअखेर त्यांनी 5 बाद 242 धावा जमविल्या.
विंडीजचा डावखुरा स्पिनर जोमेल वारिकनने 58 धावांत तीन बळी मिळवित यजमानांच्या फलंदाजांसमोर आव्हान उभे केले होते. शदमन इस्लामने पहिल्या दिवशी बांगलादेशतर्फे सर्वाधिक 59 धावा जमविल्या. त्याचे हे दुसरे कसोटी अर्धशतक आहे. नजमुल हुसेन शांतो, मोमिनुल हक व मुश्फिकुर रहीम यांनी चांगली सुरुवात केली. पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यांनी अनुक्रमे 25, 26 व 38 धावा जमविल्या. नजमुल धावचीत झाला तर मोमिनुल व मुश्फिकुर यांना वारिकनने बाद केले. उपाहारावेळी बांगलादेशने 2 बाद 62 धावा जमविल्या होत्या. पहिल्या सत्रातच तमिम इक्बालला केमार रोशने एका अप्रतिम चेंडूवर 9 धावांवर त्रिफळाचीत केले. दुसऱया सत्रात बांगलादेशने 71 धावांची भर घालताना आणखी दोन गडी गमविले तर शेवटच्या सत्रात एक गडी गमवित 72 धावांची भर घातली. लिटन दास 34 व शकीब हसन 39 धावांवर दिवसअखेर खेळत असून दोघांनी सहाव्या गडय़ासाठी 49 धावांची अभेद्य भागीदारी केली आहे.
सुमारे वर्षभरानंतर बांगलादेशची ही पहिलीच कसोटी असून विंडीजने मात्र पाच कसोटी खेळल्या आहेत. सट्टेबाजांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला न दिल्याबद्दल आयसीसीने शकीब हसनवर बंदीची कारवाई केली होती. ही बंदी संपल्यानंतर पुनरागमनातील त्याची ही पहिलीच कसोटी आहे. विंडीज संघातून एन्पुमाह बॉनर, काईल मेयर्स, शायने मोसली या तिघांनी कसोटी पदार्पण केले आहे. बॉनर हा लेगस्पिनर आहे तर मेयर्स व मोसली यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये अष्टपैलू कामगिरी करून राष्ट्रीय संघात स्थान मिळविले आहे.
संक्षिप्त धावफलक ः बांगलादेश प.डाव 90 षटकांत 5 बाद 242 ः शदमन इस्लाम 59 (154 चेंडूत 6 चौकार), तमिम इक्बाल 9, नजमुल हुसेन शांतो 25, मोमिनुल हक 26, मुश्फिकुर रहीम 38, शकीब हसन खेळत आहे 39, लिटन दास खेळत आहे 34, अवांतर 12. गोलंदाजी ः जोमेल वारिकन 3-58, केमार रोश 1-44, रहकीम कॉर्नवॉल 0-56, गॅब्रिएल 0-51.