वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशचा सलामीचा फलंदाज शदमन इस्लामला धोंडशिरेची दुखापत झाल्याने त्याला विंडीजविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱया दुसऱया व शेवटच्या कसोटीसाठी अनफिट ठरविण्यात आले आहे.
आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असलेल्या या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना तो विचित्र पद्धतीने पडला, त्यावेळी त्याला ही दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो सावरत आहे, असे बांगलादेश क्रिकेट मंडळाने सांगितले. बीसीबीच्या वैद्यकीय पथकानेही त्याला दुसऱया कसोटीत न खेळविण्याचा सल्ला दिला असल्याने तो बायोबबलमधून बाहेर पडणार आहे. त्याची दुखापत व उपचारावर बीसीबी वैद्यकीय पथक लक्ष ठेवणार आहे. पहिल्या कसोटीवेळी अष्टपैलू शकीब अल हसनही जखमी झाला होता. त्यातून तो अद्याप पूर्ण बरा झाला नसल्याने तोही दुसऱया कसोटीत खेळू शकणार नसल्याचे याआधीच जाहीर करण्यात आले आहे. त्याच्या जागी सौम्या सरकारला संघात स्थान देण्यात आले आहे. विंडीजने पहिली कसोटी जिंकून आघाडी घेतली असून दुसरी कसोटी गुरुवारपासून सुरू होत आहे.