‘बेधडक’ चित्रपटाची निर्मिती लांबणीवर
संजय कपूरची मुलगी शनाया ही करण जौहरचा चित्रपट ‘बेधडक’द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. परंतु निर्मात्यांनी हा चित्रपट अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकल्याचे समजते. चालू वर्षाच्या प्रारंभी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तसेच चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले होते. यात शनायासोबत लक्ष्य लालवानी आणि गुरफतेह पीरजादा दिसून आले होते.
धर्मा प्रॉडक्शनचा चित्रपट ‘बेधडक’ हा गुंडाळला गेला आहे किंवा तो अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे. मार्च महिन्यात चित्रपटाची घोषणा केल्यानंतर निर्मात्यांनी यासंबंधी कुठलीही अपडेट शेअर केलेली नाही. परंतु याप्रकरणी अद्याप कुठलेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.
शनाया कपूरने जान्हवी कपूरचा चित्रपट ‘गुंजन सक्सेना ः द कारगिल गर्ल’मध्ये सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केले होते. तेव्हापासूनच तिच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा सुरू झाली होती. शशांक खेतानकडून दिग्दर्शित होणाऱया ‘बेधडक’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार असल्याचे शनायाने सोशल मीडिया पोस्टद्वारे जाहीर केले होते.
चित्रपटातील मुख्य अभिनेता लक्ष्य यापूर्वी ‘दोस्ताना 2’ चित्रपटाद्वारे पदार्पण करणार होता. परंतु हा चित्रपटही गुंडाळण्यात आला. करण जौहर आणि कार्तिक आर्यन यांच्यातील भांडणामुळे लक्ष्यला फटका बसला होता. तर गुरफतेह हा ‘प्रेंड इन लॉ’ आणि ‘आय ऍम अलोन, सो आर यू’ चित्रपटात काम केले आहे.