चिकन-मटण, मासे, खेकडे यांची खरेदी जोरात
प्रतिनिधी/ बेळगाव
मंगळवारपासून श्रावणमासाला प्रारंभ होणार आहे. श्रावणात मांसाहार वर्ज्य असल्याने आषाढी अमावास्येला मांसाहाराचा बेत आखला जातो. मात्र, रविवारी लॉकडाऊन असल्याने मांसाहारप्रेमींची निराशा झाली. मात्र, शनिवारीच चिकन-मटणची खरेदी करण्यात येत असल्याचे दिसून आले. यामुळे शनिवारचा दिवस मांसाहारासाठी 70 ते 80 टक्के खरेदीचा ठरला. मटणाचा दर सहाशे पार तर चिकन दर दीडशे होता.
श्रावण सुरू होण्यापूर्वी मांसाहाराला पसंती दर्शविली जाते. यामुळे आठवडय़ाभरापासून चिकन- मटण दुकानात गर्दी असल्याचे दिसून येत आहे. चरबीयुक्त मटणाचा दर 600 रु. किलो तर चरबीविरहीत मटणाचा दर 640 रु. किलो आहे. चिकनचा दर आवक होईल त्याप्रमाणे ठरत असला तरी मागील पंधरवडय़ात 140 रु. प्रतिकिलो असणारा चिकनचा दर मागणी वाढल्याने 180 वर जाऊन पोहचला आहे. अंडय़ांचा दर शेकडा 380 रु. आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर खरेदी वाढली
रविवारी 100 टक्के लॉकडाऊन असल्याने आषाढी पार्टीसाठी शनिवारी चिकन- मटणच्या दुकानात तोबा गर्दी झाल्याचे दिसून आले. अनेकजण सोमवारी मांसाहार टाळतात. यामुळे रविवारी मांसाहाराचा बेत आखण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, पूर्वतयारी म्हणून शनिवारीच चिकन-मटण तसेच मासे, खेकडे यांची खरेदी करण्यात येत होती. यामुळे सकाळपासूनच मटण-चिकन दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी झाली होती. यामुळे लॉकडाऊन असले तरी मांसाहारप्रेमींनी पूर्वतयारी करून ठेवली असल्याचे चित्र अनुभवायला मिळाले. शिवाय अनेकांकडून आगाऊ ऑर्डरप्रमाणे चिकन-मटण घेऊन जात असल्याचे दिसून आले.
उदय घोडके (बेळगाव मटण असोसिएशनचे अध्यक्ष)
रविवारी लॉकडाऊन असल्याने शनिवारीच खरेदी करण्यात आली. श्रावणमासाच्या पार्श्वभूमीवर आठवडाभरापासून मटण खरेदी वाढली आहे. मटणाचा दर 600 ते 640 रु. असून आषाढी अमावास्येच्या निमित्ताने मांसाहाराला पसंती दर्शविली जात असल्याचे उदय घोडके यांनी सांगितले.
समीर मुजावर (चिकन विक्रेते, पांगुळ गल्ली)
आवक कमी-अधिक होईल त्याप्रमाणे चिकनचा दर ठरतो. मात्र, सध्या म़ागणी वाढली असल्याने दर 180 रु. प्रति किलो आहे. रविवारी लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत असल्याने शनिवार हा 80 टक्के व्यवसायाचा ठरत असल्याचे मत समीर मुजावर यांनी सांगितले.