वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे सुरू असलेल्या आठव्या प्रो कबड्डी लीग हंगामातील शनिवारी खेळविले गेलेले अटीतटीचे तिन्ही सामने बरोबरीत राहिले. यु मुंबा आणि युपी योद्धा यांच्यातील सामना 28-28 अशा गुणांनी बरोबरीत राहिला. त्याचप्रमाणे बेंगळूर बुल्स आणि तेलगु टायटन्स यांच्यातील सामनाही 34-34 अशा गुणांनी बरोबरीत राहिला. दबंग दिल्ली व तामिळ थलैवाज यांच्यातील शेवटचा सामनाही 30-30 असा टाय झाला.
यु मुंबा आणि युपी योद्धा यांच्यातील सामन्यात युपी योद्धाच्या सुमीतने 6 टॅकल गुण मिळविताना प्रदीप नरवाल आणि अभिषेक सिंग या दोन रायडर्सना आक्रमक खेळापासून रोखले. या सामन्यातील शेवटचे मिनिट बाकी असताना यु मुंबा संघाने युपी योद्धा संघावर एक गुणांची आघाडी मिळविली होती पण त्यानंतर कर्णधार फझल अत्राचलीने युपी योद्धा संघाला बरोबरीची संधी मिळवून दिली. या सामन्यात यु मुंबाचा कर्णधार फझल अत्राचली तसेच युपी योद्धाच्या प्रदीप नरवालच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते. यु मुंबा संघाने सर्वाधिक म्हणजे 15 टॅकल गुण मिळविले. यु मुंबा संघातील रिंकुने चार टॅकल गुण मिळविले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत दोन्ही संघातील बचावफळीतील खेळाडूंचे वर्चस्व दिसून आले. सामन्याच्या उत्तरार्धात यु मुंबाचे रायडर्स डाव्या बगलेतून अधिक गुण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. यु मुंबाच्या एम. मोहसीन आणि रिंकु यांनी शानदार कामगिरी केली. मध्यंतरावेळी यु मुंबाने 16-13 अशी आघाडी मिळविली होती. युपी योद्धाने उत्तरार्धातील खेळाच्या सहाव्या मिनिटाला आपल्या संघाला 19-19 अशी बरोबरी साधून दिली. सुरिंदर गिलने आपल्या चढाईत तीन गुण मिळविले. सामन्याच्या अखेरीस मुंबईच्या अजित कुमारने युपी योद्धाला आघाडी घेण्यापासून रोखले. दोन्ही संघांच्या रायडर्सनी आक्रमक खेळ करत अखेर हा सामना 28-28 असा बरोबरीत राखला.
शनिवारी झालेल्या या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात पवन शेरावतच्या शानदार कामगिरीमुळे बेंगळूर बुल्सने तेलगु टायटन्सला 34-34 असे बरोबरीत रोखले. या सामन्यात तेलगु टायटन्सने दोनवेळा बेंगळूर बुल्सचे सर्व गडी बाद करून वर्चस्व ठेवले होते. तेलगु टायटन्स संघातील अंकीत बेनीवाल याची कामगिरी दर्जेदार झाली. तेलगु टायटन्सचा कर्णधार रोहितकुमार याची पूर्वार्धातील कामगिरी चांगली झाली नाही त्याला एकही गुण मिळविता आला नाही. मात्र अंकीत बेनीवाल आणि राकेश गौडा या दोन्ही रायडर्सनी सामन्याच्या मध्यंतरापर्यंत प्रत्येकी चार गुण मिळविले. मध्यंतरापर्यंत बेंगळूर बुल्सने तेलगु टायटन्सवर 14-12 अशा गुणांनी आघाडी मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धात तेलगु टायटन्सने 22-22 अशी बरोबरी साधली. तत्पूर्वी तेलगु टायटन्सने बेंगळूर बुल्सचे सर्व गडी बाद केले. अंकीत बेनीवालने सुपर 10 मिळविले. मात्र बेनीवालला रोहितकुमारकडून साथ मिळू शकली नाही. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना तेलगु टायटन्सने दुसऱयांदा बेंगळूर बुल्सचे सर्व गडी बाद केले. अखेरच्या क्षणी आदर्शने बेंगळूर बुल्सला हा सामना बरोबरीत सोडविण्यात हातभार लावला.
आजचे सामने
1) बंगाल वॉरियर्स वि. जयपूर पिंक पँथर्स
वेळ ः रात्री 7.30 वा.
2) तेलुगू टायटन्स वि. पाटणा पायरेट्स
वेळ ः रात्री 8.30 वा.
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्ने हॉटस्टार.