14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहेत 2139 जण : 85 जणांवर उपचार सुरू
प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये बेळगावला दिलासा मिळाला आहे. दिवसभरात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. जिल्हय़ातील 141 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून त्यामुळे प्रशासनाला तूर्त दिलासा मिळाला आहे.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने शनिवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील 15 हजार 223 जणांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा जिल्हय़ांतून आलेल्या 2 हजार 139 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे.
आतापर्यंत 5 हजार 86 जणांनी 14 दिवसांचे तर 7 हजार 913 जणांनी 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले आहे. जिल्हय़ातील 13 हजार 927 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 13 हजार 94 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 297 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात 85 जणांवर उपचार करण्यात येत आहेत. बाधितांमध्ये लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध आदींचा समावेश आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर व परराज्यांतून येणाऱया चाकरमान्यांचे लोंढे वाढल्यामुळे साहजिकच बाधितांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. वारंवार बदलणारे शासकीय नियम, क्वारंटाईनमधील सावळा गोंधळ, स्वॅब तपासणी अहवाल येण्याआधीच संशयितांची सुटका करण्याच्या प्रकारांमुळे रुग्णसंख्येत भर पडत आहे.
175 जणांच्या स्वॅब अहवालांची प्रतीक्षा
आतापर्यंत 219 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. प्रशासनाला आणखी 175 जणांच्या स्वॅब तपासणी अहवालांची प्रतीक्षा आहे. एक-दोन दिवसात हे अहवाल उपलब्ध होणार आहेत. त्यानंतरच रुग्णसंख्या स्थिर राहणार की वाढ होणार हे स्पष्ट होणार आहे.