प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या वाढती आहे. शनिवारी 631 जण कोरोनामुक्त झाले असून वेगवेगळय़ा इस्पितळांमधून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. तर जिल्हय़ातील 274 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत चौघा जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागातील अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव तालुक्यातील 60 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहर व उपनगरांतील 48 व ग्रामीण भागातील 12 जणांचा यामध्ये समावेश आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांच्या संख्येने 16 हजारांचा आकडा पार केला असून आतापर्यंत 12 हजार 685 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या सिव्हिल हॉस्पिटलसह वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये 3 हजार 142 जण सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. एकूण मृतांचा सरकारी आकडा 237 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 1 लाख 20 हजार 835 जणांची तपासणी झाली आहे. त्यापैकी 1 लाख 3 हजार 510 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
के. के. कोप्प, कर्ले, कडोली, करिकट्टी, बस्तवाड, मच्छे, हिरेबागेवाडी, गोजगा, करडीगुद्दी, बॉक्साईट रोड, गुड्सशेड रोड, अशोकनगर, महांतेशनगर, वैभवनगर, राणी चन्नम्मानगर, जयनगर, टिळकवाडी, सह्याद्रीनगर, शहापूर, रेलनगर, शांतीनगर-टिळकवाडी, बसव कॉलनी, चौगुलेवाडी, अयोध्यानगर-चौगुलेवाडी, भाग्यनगर, कुवेंपूनगर, रामतीर्थनगर परिसरात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
विजयनगर, स्वामीनाथ कॉलनी, हिंडलगा, टी.व्ही. सेंटर, वीरभद्रनगर, हनुमाननगर, नेहरुनगर, कोळी गल्ली परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी खासगी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.