वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळच्या शबरीमला येथील भगवान अयप्पा मंदिर 17 ते 21 जुलैपर्यंत म्हणजेच 5 दिवसांसाठी मासिक धार्मिक विधींसाठी खुले करण्यात आले आहे. दर्शनासाठी इच्छुक लोकांना मागील 48 तासांमधील आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल किंवा लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. त्यानंतर संबंधिताला दर्शनाची अनुमती दिली जाणार आहे.
भाविकांना प्रथम ऑनलाइन बुकिंग करावे लागणार आहे. प्रतिदिन 5 हजार भाविकांनाच दर्शनाची अनुमती असणार आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कमी संख्येत भाविकांना प्रवेशाची अनुमती देण्यात येत आहे. कोरोना संकटामुळे यापूर्वी शबरीमला मंदिर बंद करण्यात आले होते.
मंदिराचे पुजारी आणि पदाधिकाऱयांना सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. सरकारच्या दिशानिर्देशांनुसार भाविकांना फेस मास्क, सामाजिक अंतर यासारख्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
21 जुलै मासिक धार्मिक विधी पूर्ण झाल्यावर शबरीमला मंदिर पुन्हा बंद करण्यात येणार आहे. पण शबरीमला मंदिर दर महिन्याला धार्मिक विधींसाठी खुले करण्यात येत होते. यापूर्वी भाविकांना प्रवेशाची अनुमती दिली जात नव्हती.
शबरीमला हे भारतातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येत भाविक भगवान अयप्पाचे दर्शन घेण्यासाठी येतात. शबरीमला मंदिर सुमारे 800 वर्षे जुने असल्याचे मानले जाते. भगवान अयप्पा ब्रह्मचारी होते, याचमुळे मंदिरात यापूर्वी 10-50 या वयोगटातील महिलांचा प्रवेश वर्ज्य होता. पण 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरील बंदीची प्रथा मोडीत काढण्याचा निर्णय दिला होता.