वार्ताहर/ बेडकिहाळ :
सध्या अमली पदार्थविरोधात तीव्र कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस व सीसीबी पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी करत मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थ, गांजा जप्त केला करून काही जणांना ताब्यात घेतले आहे. त्यानुसार सदलगा पोलिसांनीही गांजाविरोधात तीव्र मोहीम उघडून शमनेवाडी व बेडकिहाळ येथे 1410 ग्रॅम गांजा जप्त करून दोघांना अटक केली आहे. बाबासाब बाळू कोरुचे (रा. शमनेवाडी) व योगेंद्र प्रकाश थरकार (वय 24, रा. बेडकिहाळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
शमनेवाडी येथे बाबासाब याने बेकायदेशीरपणे 910 ग्रॅम गांजा विक्रीसाठी ठेवला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून त्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी, डीएसपी मनोजकुमार नाईक, सीपीआय आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदलग्याचे फौजदार आर. वाय. बिळगी, बिट हवालदार श्रीकांत देवर, एल. एस. खोत, बी. बी. जिरली, एस. ए. घोडसे, व्ही. आय. हडपड, एस. ए. जम्बकोळी, एस. पी. गलगली, एस. ए. हुगार, एम. ए. जमादार, पी. एन. देसाई आदींनी केली. न्यायालयाच्या आदेशानुसार संशयिताची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे.
बेडकिहाळमध्ये गांजा बाळगणाऱयावर कारवाई
येथे उसाच्या शेतात गांजाची रोपे लावणाऱयावर सदलगा पोलिसांनी कारवाई करत एकास अटक केली. योगेंद्र प्रकाश थरकार (वय 24) असे संशयित युवकाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी बेडकिहाळ परिसरात गांजा पीक घेणाऱयावर सदलगा पोलिसांनी कारवाई केली होती.