तालिबानचे भयभीत करणारे फर्मान
तालिबानने अखेरीस स्वतःचा खरा चेहरा दाखविण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानात पाश्चिमात्य शक्तींना मदत करणाऱया लोकांच्या घरांच्या दरवाजांवर तालिबानी न्यायालयात हजर होण्याचे फर्मान चिकटविले जात आहे. शरणागती पत्करा अन्यथा मारले जाल असे त्यांना सांगितले जात आहे.
34 वर्षीय अफगाण नागरिक नाज हे 6 मुलांचे वडिल आहेत. त्यांनी ब्रिटिश सैन्याला बांधकामात मदत केली होती. नाज यांनी ब्रिटनमध्ये आश्रयाची मागणी केली, पण त्यांचा अर्ज फेटाळला गेला.
माझ्या घराबाहेर पत्र चिकटविण्यात आले आहे, ते मला मारू इच्छितात. तालिबानी न्यायालयात मला मृत्युदंड ठोठावला जाईल. मी गेलो नाही तर मला मारून टाकतील. याचमुळे मी लपून बसलो आहे, अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याची माझी इच्छा आहे, पण मला मदत हवी आहे असे नाजने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.
ब्रिटिश सैन्याच्या दुभाषीच्या घराबाहेर देखील अशाचप्रकारे पत्र चिकटविण्यात आले आहे. या व्यक्तीवर विदेशी शक्तींना मदत केल्याचा आरोप आहे. शरणागती पत्करा अन्यथा मारले जाल असे म्हटले गेले आहे. 47 वर्षीय शीर यांच्या मुलीला एक पत्र मिळाले आहे. यात इस्लामिक न्यायालयात हजर होण्याचे फर्मान आहे. न्यायालयात हजर न राहिल्यास शिकाऱयाप्रमाणे तालिबानी शोधून ठार करतील असे यात नमूद आहे.